नाशिक | प्रतिनिधी | Nashik
आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या (Nashik NMC Election) पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अ. प.) व रिपब्लिकन सेना यांच्यात युती होण्याचे संकेत मिळाल्याने शहरातील राजकीय वातावरणात मोठा बदल दिसून येत आहे. विशेषतः इच्छुक उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून या युतीमुळे निवडणुकीतील गणित सोपे होईल अशी भावना व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून नाशिकमध्ये युतीआघाडी संदर्भात विविध तर्कवितर्क सुरू होते. भाजपची भूमिका, स्थानिक समीकरणे आणि प्रभागरचनेमुळे अनेक इच्छुक संभ्रमात आहेत. मात्र शिवसेना (शिदे) आणि राष्ट्रवादी (अ.प.) व रिपब्लिकन सेना यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याच्या बातम्या बाहेर येत आहेत. यामुळे ब-याच इच्छुकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. तीनही पक्षांची संघटनात्मक ताकद, कार्यकत्यांचे जाळे आणि निवडणुकीतील अनुभव लक्षात घेता ही बुती नाशिक मध्ये प्रभावी ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
शहरातील अनेक प्रभागांमध्ये शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अ.प.) यांचे कार्यकर्ते स्वतंत्रपणे सक्रिय होते. युती झाल्यास मतांचे विभाजन टळेल आणि थेट मुकाबला करण्यास मदत होईल, असे इच्छुकांचे मत आहे. विशेषतः नवीन नाशिक परिसरात युतीचा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही प्रभागांमध्ये तर युतीमुळे ‘विजय निश्चित असल्याची चर्चा कार्यकत्यांमध्ये सुरू आहे, युतीच्या संकेतामुळे इच्छुकांच्या प्रचारातही गती आली आहे. पोस्टर, संपर्क मोहीम, बैठका आणि सामाजिक कार्यक्रमांना वेग आला असून अनेक इच्छुक पुन्हा जोमाने मैदानात उत्तरल्याचे दिसून येत आहे.
एकत्र लढल्यास महापालिकेवर सत्ता मिळवणे शक्य आहे, असा आत्मविश्वास तिनही पक्षांच्या नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र, युतीबरोबरच तिकीट वाटपाचे आव्हानही मोठे असणार आहे. जागावाटपात समतोल राखला नाही तर नाराजीचे सूर उमटू शकतात, अशीही दबक्या आवाजात चर्चा आहे. काही प्रभागांमध्ये तीनही पक्षाचे ताकदवान इच्छुक असल्याने ‘फ्रेंडली फाईट’ किंवा बंडखोरी टाळण्याचे आव्हान नेतृत्वासमोर असेल. तरीही सध्या तरी युतीच्या (Alliance) चर्चेमुळे निर्माण झालेला सकारात्मक माहोल इच्छुकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करणारा ठरत आहे. एकूणच, शिवसेना (शिदे) राष्ट्रवादी (अ.प.) व रिपब्लिकन सेना युतीचे संकेत नाशिक महापालिका निवडणुकीच्या राजकारणाला नवी दिशा देणारे ठरत असून, येत्या काळात अधिकृत घोषणा आणि जागावाटपाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रिपब्लिकन सेनेला किती जागा?
नुकत्याच झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत रिपब्लिकन सेनेने शिवसेनेसोबत युती केल्याने इगतपुरीमधून आपले तीन उमेदवार निवडून आणत आपले खाते खोलले होते. महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन सेनेने १० टक्के जागांची मागणी केली आहे त्यापैकी त्यांच्या वाटेला किती जागा येतील हे येणारा काळच सांगेल.




