Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजManikrao Kokate : नशिबाने मिळाले, कर्माने गमावले

Manikrao Kokate : नशिबाने मिळाले, कर्माने गमावले

सिन्नर | विलास पाटील | Sinnar

बनावट कागदपत्रांच्या आधारे सद‌निका लाटण्याचा ठपका ठेवत जिल्हा सत्र न्यायालयाने तालुक्याचे आमदार तथा राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे (Minister Manikrao Kokate) यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा ठोठवल्यानंतर तालुक्यात त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कोकाटे यांनी न्यायालयीन (Court) लढाईकडे गांभीयनि पाहिले नाही, असे काहींना वाटते. तर काहींच्या मते, “काही होत नाही बुवा, पाहू काय करायचे ते वेळेवर “ही बेफिकिर वृत्ती कोकाटे यांचा घात करून गेल्याची भावना व्यक्त होत आहे. तालुक्याचे नेतृत्व करणाऱ्या एका बेधडक नेत्याला अशी शिक्षा झाल्याने अनेकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ‘नशिबाने मिळाले, ते कर्माने गमावले’ अशीही भावना व्यक्त होत आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Manikrao Kokate : माजी मंत्री कोकाटेंना जेल की बेल? हायकोर्टात तीन वाजता सुनावणी

YouTube video player

सन १९९२ मध्ये लागलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत माणिकराव कोकाटे यांना तिकीट देण्यास तत्कालीन आमदार तुकाराम दिघोळे तयार नव्हते. त्यावेळी माणिकराव आणि अशोक घुमरे हे दोघेही तिकिटाच्या शर्यतीत होते. दिघोळे यांचा कल घुमरे यांच्या बाजुने होता. तसे दोघेही युवक काँग्रेसच्या (Congress) मुशीत तयार झालेले. घुमरे यांच्या तुलनेत कोकाटे जरा अधिकच आक्रमक होते. जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या कोकाटे यांनी मुंबईत अधिकृत ए. बी. फॉर्म दिघोळे यांच्या ताब्यात दिले जात असतानाच तत्कालीन शहा गटाचा कोरा ए. बी. फॉर्म पळवल्याची चर्चा त्यावेळी झाली होती. या निवडणूकीत घुमरे यांना नाइलाजाने अपक्ष उमेदवारी करावी लागली. त्यातच दिघोळे यांचे समर्थक असणाऱ्या अशोक हांडोरे यांनीही भाजपच्या (BJP) तिकिटावर बंडखोरी केली.

तर सध्या न्यायाधीश म्हणून कार्यरत असलेले दिलीप शिवाजीराव घुमरे यांनीही तेव्हा अपक्ष म्हणून उमेदवारी केली होती. या चौरंगी लढतीत दोन घुमरे व हांडोरे यांच्यातील मत विभागणीचा फायदा घेत कोकाटे यांनी जिल्हा परिषदेत ३००-४०० मतांच्या फरकाने प्रवेश केला आणि त्यातूनच त्यांचा खऱ्या अर्थनि राजकीय उदय झाला. त्या काळात जिल्हा परिषद सदस्यालाही पंचायत समितीचा सभापती होता यायचे. तेव्हाही कोकाटे यांना सभापतिपदाची उमेदवारी देण्याची दिघोळे यांची मानसिकता नव्हती. मात्र, दिघोळे यांच्यासोबतच्या काही कार्यकत्यांनी तालुक्याच्या पूर्व भागात सूर्यभान गडाख यांना टक्कर देणारा कार्यकर्ता मिळाल्याची भावना व्यक्त केली तर काहींनी कोकाटे यांच्या उमेदवारीला विरोध केला. शेवटी कोकाटे यांच्या बाजूने झुकते माप मिळाले आणि दिघोळे यांनी त्यांना सभापतीपदाची उमेदवारी देऊन टाकली, काँग्रेसचे पंचायत समितीत बहुमत असल्याने कोकाटे सभापतीपदी विजयी झाले.

हे देखील वाचा : Nashik BJP Politics : मनपा निवडणूक प्रमुखपदावरून राहुल ढिकलेंना डच्चू; ‘त्या व्हिडीओतील विधान’ भोवल्याची चर्चा!

सभापती होताच पंचायत समितीत सभापतीसाठी प्रशस्त केबिन, टेलिफोन व अनेक अत्याधुनिक सुविधा बसवून कोकाटे यांनी आपली पुढची वाटचाल कशी असेल याची झलक दाखवून दिली होती. त्या काळात आमदारांच्या शिफारशीवरून दहा टक्क्यांच्या कोट्यातील सदनिका मुख्यमंत्री वाटायचे. दिघोळे यांनी भाऊसाहेब शिंदे, कोकाटे यांच्यासह अनेकांना या सदनिका मिळवून दिल्या, कोकाटे यांची निर्णय घेण्याची बेधडक वृत्ती पाहता, दिघोळे यांच्याशी त्यांचे फार दिवस जमेल असे कोणालाच वाटले नव्हते. काही दिवसांतच याची प्रचिती आली, दिघोळे यांनी कोकाटे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची खेळी खेळली. कोकाटे यांनीही आपला चाणाक्षपणा दाखवून दिला आणि दिघोळे यांच्याच तोडीच्या प्रमुख कार्यकर्त्याला पळवल्याची चर्चा झाली.

‘बेस्ट बाबूराव’ नावाने प्रसिद्ध असलेल्या या सदस्याला पळवण्याचे नाटक अविश्वास ठराव फेटाळण्यापर्यंत पोहोचले. मात्र, त्यानंतरचा अविश्वास प्रस्ताव कोकाटेंना पेलला नाही आणि त्याना सभापतिपदावरून पायउतार व्हावे लागले. मात्र, त्यापूर्वीच लागलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दिघोळे यांना तिकीट नाकारले आणि समर्थकांच्या आग्रहावरून दिघोळे यांनी अपक्ष उमेदवारी केली. अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर राज्यातील युतीच्या सरकारला (Yuti Government) पाठिंबा देणाऱ्या अपक्षांचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये दिघोळे होते, त्यामुळे त्यांना राज्यमंत्रिपद देण्यात आले होते. या लाल दिव्याचा अविश्वास प्रस्तावालाही फायदा झाला होता. अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर कोकाटे अजूनच आक्रमक झाले. मंत्रीपदाचा कार्यकाळ संपत आलेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि दिघोळे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्यानंतरच्या तीनचार महिन्यांतच विधानसभेची निवडणूक लागली आणि दिघोळे यांच्याविरोधात शड्डू ठोकून उभ्या राहिलेल्या कोकाटेंना सिन्नरकरांनी वर्गणी काढून निवडून दिले.

हे देखील वाचा : मोठी बातमी! अखेर अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला

त्यानंतर सलग तीन वेळा आमदार होत कोकाटे यांनी दिघोळे यांचा हॅटट्रिकचा विक्रम मोडला, कोकाटे पहिल्यापासून फटकळ स्वभावाचेच होते. त्यांनी अनेक वाद स्वतः हुन ओढून घेतल्याचेही तालु‌क्याने पाहिले. काँग्रेसचे आमदार असताना कोकाटे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिवसभरासाठी सिन्नरला आणले. दिवसभरात अनेक विकासकामांचे चव्हाण यांच्याच हस्ते तालुकाभर भूमिपूजन करण्यात आले. सायंकाळच्या आडव्या फाट्यावरील जाहीर सभेत, “साहेब, तुम्ही पुढच्या विधानसभा निवडणुकीत याल की नाही माहित नाही. मात्र, हा पठ्ठ्या आत्ताच निवडून आला आहे,” अशी दर्पोक्ति कोकाटे यांनी चव्हाण यांच्यासमोरच दिली. त्यावेळच्या निवडणुकीत राजाभाऊ वाजे यांनी कोकाटे यांचा पराभव करीत त्यांचे विमान जमिनीवर आणले. त्यानंतरच्या दोन्ही निवडणुका कोकाटे यांनी जिंकत पाच वेळा आमदार होण्याचा बहुमान मिळवला. राज्याचे कृषिमंत्रिपद त्यांच्याकडे चालून आले, बोलण्याच्या ओघात कोणाच्या भावना दुखतील याची चिंता कोकाटे यांनी कधीच केली नाही. बोलतांना परिणामांचा कधीही विचार केला नाही. त्याचा फटका म्हणून त्यांचे कृषिमंत्रीपद गेले. तरीही नशिबाने पुन्हा साथ दिली आणि दुसऱ्यांदा राज्याचे क्रीडा व अल्पसंख्यांक खात्याचे मंत्रीपद त्यांना देण्यात आले.

नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात सिन्नरला सभा घेताना पुन्हा त्यांचे तोंडावरचे नियंत्रण सुटले आणि ज्या भाजपच्या नेतृत्वाखालील राज्याच्या सत्तेत आपण मंत्री आहोत त्याच भाजपावर आरोप करीत त्यांचा डीएनए तपासण्याची भाषा ते करत बसले. मात्र, त्याचवेळी त्यांनी अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष केले. ज्या दिघोळे यांनी त्यांना सदनिका मिळवून दिली होती, त्यांनीच कोकाटे विरोधात गेल्यानंतर सदनिका मिळवताना दिलेल्या बनावट कागदपत्रांची तपासणी करून कोकाटे यांच्य विरोधात शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा अधिकाऱ्यांकडून दाखल करून घेतला होता, याचा त्यांना विसर पडला होता. “काही होत नाही रे, पाहू वेळ आल्यावर ही त्यांची बेफिकिरी वृत्तीच त्यांच्या घाताला कारणीभूत ठरली. मार्चमध्ये पहिला निकाल विरोधात गेल्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयात केलेल्या अपीलाकडे त्यांनी दुर्लक्ष केले.

हे देखील वाचा : मोठी बातमी! मंत्री माणिकराव कोकाटेंना नाशिक सत्र न्यायालयाचा दणका; अटक वॉरंट जारी

पक्षाने स्टार प्रचारकांच्या यादीत घेतल्यानंतर ते राज्यभर भाषणे देत फिरले आणि न्यायालयातील तारखांना हजर राहिले नाहीत. अखेर दोन वर्षांच्या खालच्या न्यायालयाच्या शिक्षेवर सत्र न्यायालयाने शिक्कामोर्तब केले, तेव्हा सारेच सिन्नरकर हबकून गेले. कोकाटे मंत्री झाल्यानंतर तालुक्यात अनेक विकास योजना त्यांनी आणल्या होत्या. कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. अनेक योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यावर आहेत. सिन्नरचा (Sinnar) चेहरा-मोहरा खऱ्या अर्थान बदलण्याची वेळ जवळ आली असतानाच न्यायालयाच्या आदेशाने घात झाल्याची भावना व्यक्त होत आहे. कोणी कोकाटे यांच्या स्वभावाला दोष देतंय, कोणी त्यांच्या बोलण्याला तर कुणी त्यांच्या बेफिकिर वृत्तीला. राजकीय आयुष्यात नेहमीच संघर्ष करावा लागलेल्या कोकाटेंना पहिल्यांदाच राज्याच्या विकासाच्या निर्णय प्रक्रियेत भाग घेण्याची संधी मिळाली होती, नशिबाने मिळालेली ही संधी त्यांनीच त्यांच्या कर्माने गमावल्याची भावना तालुक्यात व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

एकनाथ

KDMC मध्ये मनसेच्या पाठिंब्याबाबत एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मनसेने विकासाच्या...

0
मुंबई | Mumbaiशिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज (शुक्रवार, 23 जानेवारी) 100 वी जयंती आहे. या निमित्ताने राज्यभरात शिवसैनिकांनी विविध कार्यक्रमांचे आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन...