नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
राज्य विधिमंडळाच्या सभागृहात रमी (Rummy) खेळण्याचा आरोप महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यावर करण्यात आला आहे. यावर त्यांनी आज (मंगळवारी) पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे. त्यातच आज ते नाशिकरोड (Nashik Road) येथे एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांच्या अंगावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून पत्ते फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकरोड येथील दुर्गा उद्यान मंदिराजवळ कोकाटे यांच्या अंगावर पत्ते फेकण्याचा (Throw Cards) प्रयत्न ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी उपजिल्हाप्रमुख भैय्या मणियार यांच्यासह तीन ते चार शिवसैनिकांना अटक केली आहे.
दरम्यान, यावेळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने ठाकरेंची शिवसेना (Shivsena UBT) आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या (Ajit Pawar NCP) कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणा युद्ध झाले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, या कार्यक्रमादरम्यान नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. तर वाहतूकही मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्याचे बघायला मिळाले.




