नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेशाची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. मात्र, गोडसे यांनी या चर्चांना स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. तथापि, शिंदेंच्या शिवसेनेतील (Shinde Shivsena) अंतर्गत गटबाजीमुळे निर्माण झालेल्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर या शक्यतेला अधिक बळ मिळताना दिसत आहे.
शिंदेंच्या शिवसेनेत दोन गटांमध्ये रस्सीखेच वाढली असून, अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. माजी खासदार (MP) असताना एकत्रित शिवसेनेतही (Shivsena) अशाच स्वरूपाची गटबाजी अनुभवलेल्या हेमंत गोडसे यांनी त्यावेळी ‘अकेला चलो रे’ अशी भूमिका घेत स्वतंत्रपणे कारभार केला होता. सध्याची परिस्थितीही त्याच्याशी साधर्म्य दर्शवते, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडे गोडसे कल झुकवतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान,आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Body Election) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे घडल्यास नाशिकच्या राजकारणात मोठा भूकंप होऊ शकतो, असे काही जाणकारांचे म्हणणे आहे. मात्र, या सर्व चर्चांवर खुद्द हेमंत गोडसे यांनी प्रतिक्रिया देताना भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या वृत्ताला स्पष्ट नकार दिला आहे. सध्या तरी मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, असे ते म्हणाले आहेत. तरीही, त्यांच्या संभाव्य पक्षांतराबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून, अधिकृत घोषणा होईपर्यंत या चर्चा थांबणार नाही हे निश्चित आहे.




