Friday, May 8, 2026
HomeराजकीयSudhakar Badgujar : ठाकरेंचे विश्वासू शिलेदार, राऊतांचे राईट हँड, सलीम कुत्ता प्रकरणामुळे...

Sudhakar Badgujar : ठाकरेंचे विश्वासू शिलेदार, राऊतांचे राईट हँड, सलीम कुत्ता प्रकरणामुळे राज्यभर चर्चेत; BJP मध्ये प्रवेश करणारे बडगुजर नेमके कोण आहेत?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकमध्ये (Nashik) काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेतून (Shivsena UBT) शहरातील पक्षाचे ताकदवान नेते म्हणून ओळख असलेल्या सुधाकर बडगुजर यांची पक्षविरोधी वक्तव्य केल्याच्या कारणावरून हकालपट्टी करण्यात आली होती. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे नाशिकमध्ये असताना बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावरून नाशिकचे राजकारण चांगलेच तापले होते.

- Advertisement -

ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी नाराजी व्यक्त केली होती. पक्षातील पदाधिकाऱ्यांची नाराजी वरिष्ठ नेत्यांकडे बोलून दाखवल्यामुळे पक्ष नेतृत्वाने कारवाई केली असेल तर ती आपल्याला मान्य असल्याचे बडगुजर म्हणाले होते. ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यावर बडगुजर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. अखेर या चर्चांना आज पूर्णविराम मिळणार असून, सुधाकर बडगुजर हे आज दुपारी भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार आहेत.

मुंबईतील (Mumbai) पक्ष कार्यालयात या पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. त्यांच्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप (Babanrao Gholap) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविलेले गणेश गीते (Ganesh Gite) हे देखील प्रवेश करणार आहेत. याशिवाय आणखी काही माजी नगरसेवकांचाही पक्षप्रवेश होणार आहे. बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशाला आमदार सीमा हिरे यांच्यासह भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मोठा विरोध दर्शवला होता. पण आता याच नेत्यांच्या विरोधाला झुगारून बडगुजर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे.

कोण आहेत सुधाकर बडगुजर?

सुधाकर बडगुजर यांच्या राजकीय वाटचालीस २००७ मध्ये सुरुवात झाली. ते २००७ साली नाशिक महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक तथा माजी महानगरप्रमुख विनायक पांडे हे अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यावर महापौरपदी विराजमान झाले होते. तेव्हाच्या अपक्षांच्या गटात सुधाकर बडगुजर यांचा समावेश होता. त्यानंतर १४ जून २००८ रोजी एका जलकुंभाच्या भूमिपूजन कार्यक्रमात सुधाकर बडगुजर यांचा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला.यानंतर अभ्यासू आणि आक्रमक शैलीमुळे बडगुजर यांच्यावर पक्षाकडून कमी काळात मोठी जबाबदार सोपवण्यात आली होती. २००९ ते २०१२ ही तीन वर्षे ते नाशिक महापालिकेचे सभागृहनेतेपदावर होते. त्यानंतर २०१२ ते २०१५ या काळात बडगुजर विरोधी पक्षनेतेपदी होते. २०१९ आणि २०२४ मध्ये पक्षाकडून त्यांना नाशिक पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, या दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

सलीम कुत्ता प्रकरणामुळे राज्यभर चर्चेत

सुधाकर बडगुजर यांचा १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत २०२३ मध्ये एका पार्टीदरम्यान डान्स करतानाचा व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओनंतर विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीका केली होती. तसेच बडगुजर यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणामुळे ते राज्यभर चर्चेत आले होते. याशिवाय त्यांच्या मुलावरही मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे सुधाकर बडगुजर वादात अडकले होते.

ताज्या बातम्या

Crime News : कर्नाटकहून दिल्लीकडे जाणार्‍या सुपारीच्या वाहतुकीवर कारवाई

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar कर्नाटक राज्यातून दिल्लीकडे अवैधरीत्या वाहतूक केली जात असल्याचा संशय असलेल्या सुमारे 61 लाख 75 हजार रूपये किमतीच्या लाल सुपारीच्या सुमारे 800 गोण्या...