लोणी |वार्ताहर| Loni
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प जुन्या प्रस्तावित मार्गानेच कार्यान्वित करावा ही लोकप्रतिनिधी आणि जनतेची भावना राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्रीय रेल्वे मंत्र्यांपर्यंत पोहोचवाव्यात, अशी विनंती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. 2019 साली संगमनेर अकोले मार्गे तयार करण्यात आलेल्या प्रकल्प अहवालावरच कार्यवाही करण्याचा आग्रह त्यांनी केला आहे.
पालकमंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून रेल्वे मार्गाच्या निर्माण झालेल्या प्रश्नावर सविस्तर चर्चा केली. याबाबतची वस्तुस्थितीही त्यांनी पत्राव्दारे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. केंद्रीय रेल्वे विभागाने पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेचा प्रस्ताव 2019 साली नारायणगाव, संगमनेर, अकोले, सिन्नर असा तयार केलेला आहे. याबाबत जमीनींचे अधिग्रहनही करण्यात आले होते. मात्र या प्रस्तावात बदल करुन, हा मार्ग आता अकोले तालुक्याला वगळून नारायणगाव, संगमनेर, नाशिक अशा पध्दतीने प्रस्तावित करण्याची बाब समोर आल्यामुळे नागरीकांच्या भावना तिव्र झाल्या आहेत.
प्रकल्पामध्ये बदल करताना कोणत्याही प्रकारे लोकप्रनिधींना विश्वासात घेण्यात आलेले नाही याकडेही ना. विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. सद्य परिस्थितीत रेल्वे मार्गाच्या प्रकल्प अहवालातील बदलांमुळे लोकप्रतिनिधी आणि जनतेमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. प्रशासकीय स्तरावर रेल्वे प्रकल्पाबाबतची कोणती कार्यवाही सुरु आहे याबाबतही माहीती उपलब्ध होत नाही. तसेच पुण्याहून नाशिककडे जाणार्या रेल्वे मार्गात नारायणगाव येथील जेएमआरटी या रेडीओ टेलिस्कोप सेंटरची अडचण असल्याचे कारणही केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेमध्ये आपल्या निवेदनातून सांगितले आहे.
ही सर्व वस्तुस्थिती लक्षात घेवून रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाबाबत वस्तुस्थिती समोर यावी यासाठी आपण सर्व लोकप्रतिनिधींची बैठक बोलवावी आणि प्रकल्पाच्या मार्गाबाबत असलेलया भावना समजून घ्याव्यात. 2019 मध्ये तयार केलेल्या प्रकल्प अहवालाची अंमलबजावणी होण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून लोकप्रनिधी आणि जनतेच्या भावना केंद्रीय रेल्वे मंत्र्यांपर्यंत पोहोचवाव्यात, अशी विनंती ना. विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चे दरम्यान केली आहे.
राज्यात नुकत्याच संपन्न झालेल्या नगरपालिका निवडणूकांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेटी दरम्यान अभिनंदन केले.




