ओझे | विलास ढाकणे | Oze
दिंडोरी तालुक्यात (Dindori Taluka) पावसाने (Rain) काही दिवस विश्रांती घेतल्यामुळे शेतीकामानां वेग आला होता. या विश्रांतीच्या कालावधीत बळीराजाने शेतात सोयाबीन, मक्का,उडीद मुग तसेच भुईमूग बियाण्याची पेरणी आटपून घेतली असून, सध्या खरीप हंगामातील टोमॅटो लागवडीला जोरदार सुरुवात झाली आहे. विश्रांती घेतलेल्या पावसाने गेल्या तीन दिवसापासून पुन्हा सुरुवात केल्यामुळे धरणाच्या पाणी साठ्यातही वाढ होतांना दिसत आहे.
दिंडोरी तालुक्यातील वाघाड धरण (Waghad Dam) १०० टक्के भरले असून या धरणाच्या सांडव्यातून पाणी पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोलवण नदी काठावरील गावानां प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याप्रमाणे दिंडोरी तालुक्यासह निफाड, येवला, नांदगाव (मनमाड) तालुक्यातील जनतेला वरदान ठरलेल्या करंजवण धरणातही मोठ्याप्रमाणात जलसाठा जमा होत आहे. सध्या करंजवण धरणातील (Karanjavan Dam) पाणीसाठा ६६.४७ टक्के झाला असून, या धरणातून १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कादवा नदीत सोडण्यात आला आहे. त्याप्रमाणे दिंडोरीच्या पूर्वभागाची रक्तवाहिनी समजल्या जाणाऱ्या तीसगाव धरणाचा (Tisgaon Dam) पाणीसाठा ६२ टक्क्यांवर पोहचला आहे.
तसेच मांजरपाडा (देवसाने) प्रकल्पातून समाधानकारक पाणी येत असल्यामुळे पुणेगाव धरणात (Punegaon Dam) आजूबाजूच्या डोंगर दऱ्यांमधूनही मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत आहे. पुणेगाव धरणाचा पाणीसाठा ७४.४१ टक्के इतका झाला असून, धरणामधून उनंदा नंदीत पाणी सोडण्यात आले आहे. याच उनंदा नदीचे पाणी ओझरखेंड धरणात येत असल्यामुळे तसेच स्थानिक पाणीही ओझरखेंड धरणात जमा होत असल्याने या धरणाचा पाणीसाठा ७३.४७ टक्क्यांवर पोहचला आहे. त्याप्रमाणे गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून तालुक्यात पाऊस पडत असल्यामुळे सर्व नदी नाले प्रवाहीत झाले आहेत. हे सर्व पाणी पालखेड धरणात जमा होत असल्यामुळे पालखेड धरणातून पाणी आवक लक्षात घेऊन पाण्याचा विसर्ग केला जातो.
दरम्यान, सध्या पालखेड धरणात (Palkhed Dam) ४४ टक्के इतका पाणीसाठा असून, या धरणाच्या डाव्या कालव्यातून ४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग चालू आहे. अंदाज पाहून पाण्याचा विसर्ग कमी जास्त केला जात आहे. दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर वाढत असून, धरणाच्या पाणी साठ्यातही मोठ्या प्रमाणात वाढत होत आहे. तर वाघाड धरणाच्या सांडव्यातून पाणी पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हे सर्व पाणी पालखेड धरणात जमा होणार असल्याने धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कादवा, उनंदा, कोलवण नदी काठावरील गावानी सतर्क राहावे असे, आवाहन दिंडोरी पेठचे (Dindori Peth) प्रांत अधिकारी डॉ आप्पासाहेब शिंदे आणि दिंडोरीचे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी केले आहे.




