Monday, October 19, 2026
HomeनाशिकNashik Rain News : शहरातील काही भागात पावसाची हजेरी; त्र्यंबकेश्वरलाही जोर'धार'

Nashik Rain News : शहरातील काही भागात पावसाची हजेरी; त्र्यंबकेश्वरलाही जोर’धार’

नाशिक | Nashik

शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात (Rural Area) परतीचा पाऊस (Rain) चांगलाच सक्रिय झाला आहे. नाशिकमधील काही भागांत आज (सोमवारी) पहाटेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अर्धा तास पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते.

- Advertisement -

आज सकाळच्या सुमारास अधिक प्रमाणावर उकाडा होता, त्यामुळे नागरिक घामाघूम झाले होते. त्यानंतर दुपारच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने काहीसा गारवा निर्माण झाला होता. शहरातील शालीमार, मेनरोड, सीबीएस, मुंबईनाका, गंगापूर रोड, वडाळा, पंचवटीसह आदी भागांत पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले.

त्र्यंबकेश्वरलाही पावसाची हजेरी

त्र्यंबकेश्वर तालुक्यात (Trimbakeshwar Taluka) देखील परतीचा पाऊस चांगलाच सक्रिय झाला आहे. आज पहाटेच्या सुमारास त्र्यंबकेश्वर शहरासह ग्रामीण भागात परतीच्या पावसाने हजेरी लावली. यामुळे सखल भागात पाणी साचल्याचे बघायला मिळाले. सध्या इतर खरीप पिके काढणीच्या टप्प्यात आहेत. अशा वेळी परतीचा पाऊस जोरदार कोसळत असल्याने हाताशी आलेली पिके पावसात भिजून नुकसान होण्याची भीती बळीराजाने व्यक्त केली आहे. तर भाताच्या पिकासाठी अजूनही पावसाची आवश्यकता आहे.

पर्यटकांची तारांबळ

आज सोमवार असल्याने त्र्यंबकेश्वर येथे भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना पावसामुळे छत्री व रेनकोटचा सहारा घ्यावा लागला. शहरातही अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील २४ तासांत नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

हार्वेस्टरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू

0
पुनदखोरे | वार्ताहर कळवण तालुक्यातील हुंड्यामोख (गणोरे ) शिवारात सोयाबीन काढणी सुरू असताना हार्वेस्टर यंत्रात अडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ओम...