Sunday, October 18, 2026
HomeनाशिकNashik Rain News : नाशिकमध्ये रात्रभर जोरदार पाऊस; गोदावरीला पूर, रामकुंडावरील मंदिरे...

Nashik Rain News : नाशिकमध्ये रात्रभर जोरदार पाऊस; गोदावरीला पूर, रामकुंडावरील मंदिरे पाण्याखाली

दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी, गंगापूर धरणातून विसर्ग सुरु

नाशिक | Nashik

नाशिक शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पावसाच्या (Rain) सततच्या सरींमुळे गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाली असून, रामकुंड परिसरात (Ramkund Area) पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गोदाघाटावरील प्रसिद्ध ‘दुतोंड्या मारुती’च्या कमरेपर्यंत पुराचे पाणी पोहोचले असून परिसरातील अनेक लहान-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. तर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने गोदाघाट परिसरातील दुकाने व टपऱ्या सुरक्षित ठिकाणी हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- Advertisement -

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु

शहरासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. परिणामी, विविध धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. यामध्ये गंगापूर धरणातून (Gangapur Dam) सकाळी ८ वाजता ३,१६५ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले होते. यानंतर त्यामध्ये साडे नऊ वाजता ४,२३६ क्युसेकने वाढ करण्यात आली. तर साडे दहा वाजता एकूण विसर्ग ५,२९५ इतका करण्यात आला आहे. त्यामुळे आता पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास हा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार आहे.

कोणत्या धरणातून किती विसर्ग

तसेच नांदूर मध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या (Jaykwadi Dam) दिशेने १३,४०७ क्यूसेक, पालखेड धरणातून १०,३३२ क्यूसेक आणि दारणा धरणातून २,६४८ क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. याशिवाय कडवा, भावली आणि पुनेगाव धरणांमधूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोदावरी आणि दारणा नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नेपाळी पर्यटकाची सुखरूप सुटका

नाशिकच्या गोदाघाट परिसरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका नेपाळी पर्यटकाला स्थानिक नागरिक, अग्निशमन दल, पोलीस आणि जीवरक्षक दलाच्या जवानांनी तातडीने बचाव मोहीम राबवून सुखरूप बाहेर काढले. पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने हा पर्यटक नदीकाठावरील एका मंदिरात अडकला होता. रात्री अचानक गोदावरीची पातळी वाढल्याने त्याला बाहेर पडता आले नाही आणि त्याने संपूर्ण रात्र मंदिरातच पाण्यात काढली. यानंतर आज सकाळी त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. सदर नागरिक नेपाळचा रहिवासी असून गेल्या काही महिन्यांपासून तो नाशिकमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

ताज्या बातम्या

कोलकाता शहरात दुर्गापूजेदरम्यान चेंगराचेंगरी; १७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

0
कोलकाता पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात दुर्गापूजेच्या उत्सवादरम्यान शनिवारी (१७ ऑक्टोबर) मोठी दुर्घटना घडली. उत्तर कोलकात्यातील चोरबागान सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान १७ जणांचा...