नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक जिल्हा आणि विशेषतः नाशिक शहर व त्र्यंबकेश्वर परिसरासाठी (Nashik and Trimbakeshwar) पुढील ४८ तास अत्यंत धोक्याचे असणार आहेत. हवामान विभागाने (IMD) या भागात ढगफुटीसदृश पावसाचा अंदाज वर्तवला असून, तब्बल ३०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली जाण्याची दाट शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
तसेच, तत्काळ परिस्थिती पाहता पुढील ३ तासांत नाशिकच्या काही भागांत ताशी ६० ते ७० किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहणार असून मध्यम ते जोरदार पाऊस होईल. या संकटसमयी नाशिककरांनी पूर्णपणे सतर्क राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले आहे.
मंत्रालयातून परिस्थितीवर बारीक लक्ष, पर्यटनावर बंदी
सोमवारी (दि.७) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यातील पावसाची आणि संभाव्य पूरपरिस्थितीची उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी आज दुपारनंतर अनेक भागांत वादळी वारे वाहणार असल्याने झाडे आणि विजेचे खांब पडण्याचा धोका आहे. नागरिकांनी अत्यावश्यक काम नसताना घराबाहेर पडू नये आणि प्रवास टाळावा. विशेषतः तरुणांनी धबधबे किंवा इतर पर्यटन स्थळांवर जाण्याचे धाडस अजिबात करू नये, असे स्पष्ट निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
प्रशासन अलर्टवर
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, खालील अधिकृत सरकारी ॲप्सद्वारे अपडेट राहण्यास सांगितले आहे.
सचेत : स्थानिक पातळीवरील आपत्कालीन सूचनांसाठी.
दामिनी : वीज पडण्याच्या धोक्याची अचूक माहिती मिळवण्यासाठी.
नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाची ‘गाइडलाईन’
आपत्कालीन साहित्य सज्ज ठेवा : प्रथमोपचार पेटी, टॉर्च, जादा बॅटऱ्या, आवश्यक औषधे आणि महत्त्वाची कागदपत्रे वॉटरप्रूफ पिशवीत ठेवा.
तातडीने स्थलांतर करा : नदीकाठच्या किंवा सखल भागातील नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश दिल्यास तात्काळ सहकार्य करा.
दुर्लक्ष करू नका : पूरग्रस्त रस्ते, पाण्याखाली गेलेले पूल किंवा कॉजवे (कच्चे पूल) ओलांडण्याचा प्रयत्न करू नका. जीर्ण व धोकादायक इमारतींमध्ये आश्रय घेऊ नका.
मदतीचा हात द्या : आपल्या परिसरातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, गर्भवती महिला आणि दिव्यांग व्यक्तींना सुरक्षिततेसाठी प्राधान्याने मदत करा.
संकटकाळात तात्काळ संपर्क साधा
कोणतीही अनुचित घटना घडल्यास किंवा मदतीची गरज भासल्यास खालील क्रमांकांवर त्वरित संपर्क करा
जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष : १०७७
पोलीस मदत यंत्रणा : ११२
रुग्णवाहिका सेवा : १०८
अग्निशमन दल : १०१




