नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक जिल्ह्यात २१ ते २३ सप्टेंबरदरम्यान तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. कृषी क्षेत्रावरील प्रभाव आधारित अंदाज (IBF) आणि हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यासह (District) घाट क्षेत्रात या तीन दिवसांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर राहण्याची शक्यता आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा, कृषी हवामान प्रक्षेत्र विभाग, विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी यांच्या वतीने हा हवामान सतर्कता इशारा देण्यात आला आहे. २१ सप्टेंबर रोजी प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईकडून जारी करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय अंदाज व चेतावणीच्या आधारे हा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत नागरिकांनी बाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी, तसेच वीज चमकत असताना झाडे, विजेचे खांब आणि मोकळ्या जागेपासून सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनीही हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन शेतीची (Farm) कामे करावीत.
विजांच्या (lightning) पूर्वानुमानासाठी दामिनी मोबाईल ॲपचा वापर करावा. तसेच हवामान अंदाज, कृषी सल्ला आणि चक्रीवादळ, मुसळधार पाऊस, गारपीट व वीज यासंदर्भातील इशाऱ्यांसाठी मौसम मोबाईल ॲपचा उपयोग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील हवामान इशारा, चेतावणी आणि IBF पत्रिका प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईकडून प्राप्त झाल्यानंतर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे विभागाने कळविले आहे.




