Monday, July 22, 2024
Homeमुख्य बातम्यारंगोत्सवासाठी नाशिककर सज्ज; मंडळांनी केल्या रहाडी खुल्या

रंगोत्सवासाठी नाशिककर सज्ज; मंडळांनी केल्या रहाडी खुल्या

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

कुठे होळी तर कुठे धुळवड तर कुठे वेगळ्या रंगांची उधळण होत असताना भाव खाऊन जाते ती नाशिकची रंगपंचमी( Rangpanchami). अबाल वृद्धांपासून तरुण-तरुणीपर्यंत दरवर्षी या रंगमंचमीची आतुरतेने वाट पाहत असतात. नाशिककरांची रंगमंचमी खेळण्याची पद्धतही काहीशी वेगळी आहे.

नाशिकमध्ये जवळपास एकूण पाच रहाडी असून यापैकी दरवर्षी चार रहाड खोदून रंगपंचमी साजरी केली जाते. पेशवेकालीन रंगपंचमीची परंपरा यंदाही जपत उद्या जल्लोषात रंगपंचमी साजरी करण्यासाठी नाशिककर सज्ज झाले आहेत. ऐतिहासिक परंपरा असलेल्या रहाडी खुल्या झाल्या आहेत.चौकाचौकात सवाद्य रंगपचमीसाठी मंडळांनी जय्यत तयारी केली आहे.

सद्यस्थितीत नाशिक शहरात एकूण चार ते पाच रहाडी दरवर्षी रंगपंचमीला खुल्या केल्या जातात. यामध्ये शनी चौकातील रहाड, तांबट लेन येथील रहाड, दंडे हनुमान चौकातील रहाड, दिल्ली दरवाजा रहाड आणि तिवंधा चौकातील राहाड. या सर्व रहाड पेशवेकालीन असून प्रत्येक रहाडीची आपली वेगळी परंपरा आहे.

रहाड हीे 12 बाय 12 चा हौद असते,8 फूट खोल असलेल्या या रहाडीत रंग नैसर्गिक असतो. शहरात असलेल्या 5 रहाडी दर रंगपंचमीला खुल्या केल्या जातात.

शहरातील प्रत्येक रहाडीत तयार करण्यात आलेला रंग हा वेगवेगळ्या फुलांपासून तयार केला जातो.आपली परंपरा जपत या हौदसदृश्य रहाडीत रंगपंचमी खेळली जाते.या भूमिगत हौदात असलेले हे पाणी शरीराला अत्यंत गुणकारी मानले जाते.

देशात सर्वत्र धुळवड साजरी होते. नाशिकला मात्र रंगपंचमी धुमधडाक्यात साजरी करण्याची प्रथा आहे. त्यासाठी आज शहरात सर्वत्र सप्तरंग विकणार्‍यांंनी मोठी गर्दी केली होती. विविध प्रकारच्या पिचक़ार्‍या बच्चे कपनीला आकर्षीत करत आहे. रंगपंचमीआनंदात व शांततेत पार पडण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.

पाथर्डी फाट्यावर रंगोत्सव

इंदिरानगर। सह्याद्री युवक मित्र मंडळाच्या वतीने वासन नगर येथे तर भाजपाच्या वतीने पांडुरंग चौक, दामोदर नगर येथे रंगपंचमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गामणे मैदानावर रंगपंचमीनिमित्त आज दुपारी बारा ते चार फक्त महिलांसाठी नैसर्गिक रंगाने युक्त रंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रिंक कलरद्वारे, रेन डान्स आणि म्युझिकल कारंजे तर पंजाबी ढोल पथक आनंदात भर घालणार आहेत.

पालकमंत्री दादा भुसे तसेच विविध शासकीय पदावरील महिला अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. उत्सवाचे वैशिष्टय म्हणजे महिलांच्या सुरक्षेसाठी 20 महिला बाउन्सर, 20 खाजगी महिला सुरक्षारक्षक, चारही बाजूने बंदिस्त कपडा तसेच उत्सवाचे खास आकर्षण म्हणजे स्टार प्रवाह मराठी वाहिनीवरील टिपक्यांची रांगोळी या मराठी मालिकेतील नम्रता प्रधान नाशिककरांच्या भेटीला उपस्थित राहणार आहे.

आर जे परी निवेदन करणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक अमोल जाधव, संगीता जाधव,सुदाम डेमसे यांनी केले असून पांडुरंग चौक येथे माजी नगरसेवक भगवान दोंदे, नगरसेविका पुष्पा आव्हाड ,एकनाथ नवले, सोनाली नवले यांनी केले आहे.

रंगपंचमीचा खर्च वाचवून रुग्णांना मदत

आरोग्याच्या दृष्टिकोनातून सरकारी, खासगी ठिकाणाहून वेगवेगळ्या प्रकारे मदत केली जाते तर काही लोक समाजोपयोगी बाबीतून निरर्थक जाणारा पैसा वाचवून रुग्णांना मदत करीत असतात. अशाच प्रकारचे उदाहरण म्हणजे ठाकरे गटाचे युवा उपजिल्हा प्रमुख बाळकृष्ण शिरसाठ यांनी केलेल्या आरोग्य शिबिराचे होय. रंगपंचमीचा खर्च वाचवून आरोग्य विभागाला त्यांनी प्राधान्य देत शिवसेना, शिव मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत शिबिर आयोजित केले होते.

यात महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया, सोनोग्राफी, किडनी स्टोन, गर्भपिशवीचे सर्व आजार सर्व वयोगटातील बालक, स्त्रिया, पुरुष यांच्यासाठी आयोजित केले होते. हृदयविकार, अस्थिरोग, मेंदू विकार, किडनी रोग, कॅन्सर अशा अनेक शस्त्रक्रिया मोफत ठेवण्यात आल्या होत्या. जवळपास साडेसहाशे रुग्णांनी यात नोंदणी केली आहे. शस्त्रक्रियेसाठी 130 लोकांनी नोंदणी केली.

लाखो रुपयांची महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया मोफत करून देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व रुग्णांनी समाधान व्यक्त केले. शिबिरासाठी डॉ.सचिन सोनवणे, डॉ. अतुल सिंगल, डॉ. विलोक पाटील, डॉ. कपिल महाजन, डॉ. राहूल पाटील, डॉ. अनिकेत घाग, डॉ. विवेक मोरे, डॉ. कल्याणी सावंत यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिर पार पडले.

- Advertisment -

ताज्या बातम्या