नाशिक | प्रतिनिधी
ज्यांच्यावर कारागृहाच्या सुरक्षेची जबाबदारी आहे, त्याच खाकी वर्दीतील एका कारागृह रक्षकाने सुरक्षेला सुरुंग लावून चक्क गुप्तांगामध्ये चरस लपवून बंदीवानांना विक्री करण्यासाठी तस्करी केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रविंद्र एकनाथ पाटील (वय अंदाजे ३५, नेमणूक मध्यवर्ती कारागृह, नाशिकरोड) असे संशयित कारागृह रक्षकाचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, (दि. ४) सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाच्या झडती कक्षात ही कारवाई करण्यात आली. संशयित रविंद्र पाटील हा शासकीय नोकर असताना आणि कर्तव्यावर हजर असताना, त्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी प्रतिबंधित असलेला चरस हा अंमली पदार्थ कारागृहातील बंदीवानांना विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बाळगला. हा चरस गुप्तांगाच्या खाली चिकट टेपने चिटकवून मध्यवर्ती कारागृहात आत नेत असताना, फिर्यादी कारागृह रक्षक नारायण जयसिंग राजपूत व सहकाऱ्यांच्या अंगझडती दरम्यान रंगेहात पकडला गेला. या प्रकरणी फिर्यादी नारायण जयसिंग राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, उपनिरीक्षक भुवनेश्वर घनदाट तपास करत आहेत.
झडतीदरम्यान त्याच्याकडून ३३ ग्रॅम वजनाचा चरस हा प्रतिबंधीत असलेला अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. या प्रकारामुळे बंदीवानांचे नातलग आणि काही धाडसी कर्मचाऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. कारागृह महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी या प्रकरणी लक्ष घालून मध्यवर्ती कारागृहाची कसून झाडाझडती घ्यावी आणि दोषी असणाऱ्या संबंधित वरिष्ठ कारागृह महिला व पुरुष अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Nashik News: दिवाळीनिमित्त सिटीलिंक बस मार्गांत बदल; ‘असे’ असतील तात्पुरते बदल
कारागृहातील अनागोंदी चव्हाट्यावर
या घटनाक्रमाने कारागृहातील सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे रामभरोसे असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. याआधीही कारागृहात बंदी असताना मोबाईलवरून व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करणे, सहकाद्यांचा अनन्वित छळ करणे, चरस-गांजा ओढणे, रक्षकांना मारहाण करणे, लाचखोरी आणि कारागृहात आत्महत्या यांसारखे गंभीर प्रकार घडले आहेत. आता तर थेट सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या रक्षकानेच एनडीपीएस कायद्यांतर्गत प्रतिबंधित असलेला घातक नशेचा पदार्थ कारागृहात पोहोचवल्याने खळबळ उडाली आहे.
चरस म्हणजे काय ?
चरस हा अंमली पदार्थांच्या श्रेणीतील एक घातक आणि नशा आणणारा पदार्थ आहे. हा प्रामुख्याने केंनाबीस साटायव्हा (भांग किंवा गांजा) वनस्पतीच्या फुलांपासून आणि डिंकासारख्या चिकट स्त्रावापासून तयार केला जातो. चरसमध्ये मानवी मज्जासंस्थेवर आणि मेंदूवर विपरीत परिणाम करणारे टीएचसी नावाचे रासायनिक घटक मोठ्या प्रमाणात असतात. याचे सेवन केल्याने मानवी मानसिक आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होतात, भारत सरकारसह जगभरात एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत चरस बाळगणे, सेवन करणे, त्याची विक्री किंवा तस्करी करणे कायद्याने प्रतिबंधित आहे.




