
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
शिर्डी लगत असलेल्या सावळीविहीर बुद्रुक दरम्यान रविवारी दुपारी 2:30 वाजेच्या दरम्यान बस व इर्टीका कारच्या भीषण अपघातात इर्टीकामधील दोन सख्ख्या भावाचा मृत्यू झाला तर कार मधील 3 व बस मधील 8 प्रवाशी असे एकूण 11 व्यक्ती या अपघातात जखमी झाले. यात महिलांची संख्या मोठी असून सर्व जखमींवर साईबाबा संस्थानच्या सुपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
अधिक माहिती अशी की, राहाता येथील विशाल काशिनाथ कांबळे (वय 43) व महेश काशिनाथ कांबळे (वय 40) तसेच बहिण प्रियंका रविंद्र ससाणे (रा. श्रीरामपूर) व दोन लहान मुले हे नाशिक येथे विशाल कांबळे यांच्या मुलीचा वाढदिवस असल्याने ते इर्टीका कारमध्ये जात असतांना सावळी विहीर शिवारात समोरून येणार्या पनवेल-शिर्डी या एसटी बसची व कारची समोरा समोर धडक झाली. यात इर्टीका कारमधील दोघा भावांचा जागीच मृत्यू झाला. तर बहीण व दोन लहान मुले या अपघातात जखमी झाले. तसेच एसटी बसमधील जवळपास आठ प्रवासी या अपघातात जखमी झाले आहे.
अपघात घडल्यानंतर तात्काळ शिर्डी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे व वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक महेश येसेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन सर्व जखमींना साईबाबा संस्थानच्या सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या अपघातात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने राहाता परिसरात नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.




