नाशिक | प्रतिनिधी | Nashik
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (Shivsena) नाशिक लोकसभा संपर्कप्रमुख, आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांच्या पुढाकाराने शिवसेनेने ग्रामीण भागातील संघटन मजबूत करण्यासाठी नवी रणनीती आखली आहे. जिल्ह्यातील १३ तालुकाप्रमुखांना पक्षाच्या कामासाठी (Party Work) नव्या कोऱ्या मोटारी देण्यात येणार असून, त्याद्वारे गावागावांत पक्षाचा संपर्क वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
जिल्ह्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने पक्ष संघटन बळकट करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. विधानसभा आणि महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीला पक्षाने वेग दिला आहे. त्याचाच भाग म्हणून तालुकाप्रमुखांना पक्षीय कामासाठी वाहने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आमदार सुहास कांदे यांच्या पुढाकाराने १३ मोटारी खरेदी करण्यात आल्या आहेत. या मोटारींचा वापर केवळ पक्षाच्या संघटनात्मक कामासाठी करण्याची सूचना तालुकाप्रमुखांना देण्यात येणार असून, त्यांच्या दैनंदिन कामाचा अहवालही घेतला जाणार आहे. पक्षाला वर्षभर निवडणूक मोडमध्ये सक्रिय ठेवण्याच्या दृष्टीने ही व्यवस्था करण्यात आल्याचे कांदे यांनी सांगितले.
या मोटारींवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांची छायाचित्रे तसेच ‘शिवसेना आपल्या दारी’ असा संदेश देण्यात येणार आहे. श्रीकांत शिंदे लंडनहून परतल्यानंतर पुढील आठवड्यात या वाहनांचा लोकार्पण सोहळा होणार असल्याचे सांगण्यात आले. तालुकाप्रमुखांना वाहनांची सुविधा मिळाल्यानंतर त्यांच्यावर घरोघरी संपर्क साधण्याची जबाबदारी सोपविली जाणार आहे. विशेषतः आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गावोगावी बैठका, कार्यकर्त्यांशी संपर्क आणि संघटन विस्ताराचे काम केले जाणार आहे. ग्रामीण भागातील (Rural Area) पक्षाचे नेटवर्क मजबूत करण्यासाठी या वाहनांचा वापर केला जाणार आहे.



