Thursday, April 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिक आणि अहिल्यानगर मध्ये आर्थिक फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघड; अण्णासाहेब पाटील महामंडळाची...

नाशिक आणि अहिल्यानगर मध्ये आर्थिक फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघड; अण्णासाहेब पाटील महामंडळाची तक्रार

नाशिक । प्रतिनिधी Nasik

- Advertisement -

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेचा गैरफायदा घेऊन शाळा सोडल्याच्या दाखल्यात खाडाखोड करून आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी नाशिक पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली असून, राज्यभरातील सर्व कार्यालयांमध्ये अशा घटनांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.यासंदर्भात गुरुवारी (दि.७) नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत नरेंद्र पाटील यांनी ही माहिती दिली.

यावेळी महामंडळाच्या विभागीय अध्यक्ष पल्लवी मोरे, छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे, छत्रपती सेनेचे चेतन शेलार, निलेश शेलार उपस्थित होते. पाटील म्हणाले, मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांसाठी स्थापन झालेल्या या महामंडळामार्फत आतापर्यंत १.५ लाख लाभार्थ्यांना १२ हजार ६०० कोटींचे कर्ज वितरित झाले असून, १२२२ कोटींचा व्याज परतावा देण्यात आला आहे.

नाशिक विभागात ३६ हजार ४७७ लाभार्थ्यांना २७९८ कोटींचे कर्ज आणि २५३ कोटींचा व्याज परतावा मिळाला आहे. मात्र, धुळे येथे काही कर्मचाऱ्यांनी कर्ज मंजुरीसाठी आर्थिक मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला, ज्यामुळे त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. तसेच, नाशिक आणि अहमदनगरमध्ये काही व्यक्तींनी बनावट दाखले सादर करून फसवणूक केली.”या प्रकरणात ७ ते ८ व्यक्तींचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. पाटील यांनी पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांना सर्व माहिती सादर केली असून, दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

यापुढे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आधार-लिंक बँक खात्यात थेट व्याज परतावा जमा करण्याची प्रणाली विकसित करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे संपूर्ण कामकाज ऑनलाईन स्वरुपात चालते. त्यामुळे ‘एलवाय’ काढण्याच्या नावाखाली दलाल किंवा ऑनलाईन सेंटर चालक लाभार्थ्यांकडून पैसे उकळतात. कुणालाही एक रुपया देण्याची आवश्‍यकता नाही. फक्त अर्ज भरण्याची फी द्यावी, त्या व्यतिरीक्त एक रुपयाही लागत नसल्याचे नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

​Nashik News : कर्तव्याचा मार्ग ठरला शेवटचा प्रवास; होमगार्डचा हृदयविकाराने मृत्यू

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik समाजाच्या सुरक्षिततेसाठी खांद्याला खांदा लावून उभे राहणाऱ्या एका ‘खाकी’ वर्दीतील सेवकाचा कर्तव्यावर असतानाच मृत्यु (Death) झाला. अंबड पोलिस ठाण्यात (Ambad...