खडकमाळेगाव | वार्ताहर | Khadakmalegaon
नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) द्राक्ष उत्पादनासाठी कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्याच्या (Niphad Taluka) उत्तरपूर्व पट्ट्यातील खडक माळेगाव येथे एका प्रगतिशील शेतकऱ्याने आत्महत्या (Farmer Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खडक माळेगाव सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन संतू कचरू रायते (वय ५७) यांनी नापिकी आणि वाढत्या कर्जबाजारीपणाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलले. परिसरात संतू पाटील नावाने परिचित असलेल्या रायते यांच्या खिशात लासलगाव पोलिसांना एक सुसाईड नोट आढळून आली.
कर्जाचा डोंगर आणि शेतीमालाला मिळणारा अयोग्य भाव यामुळेच आत्महत्या करत असून यासाठी कुटुंबीयांना (Family) दोषी धरू नये, असा उल्लेख या चिठ्ठीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे, निफाड तालुक्यात भीषण दुष्काळसदृश (Drought) परिस्थिती असताना प्रशासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त यादीतून तालुक्याला वगळण्यात आले. या निर्णयाला २४ तास उलटत नाही तोच ही दुर्दैवी घटना घडल्याने शेतकरी वर्गात प्रचंड संताप व हळहळ व्यक्त होत आहे.
निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक (Grape Growers) पट्ट्यातच निसर्गाचा लहरीपणा, वाढता उत्पादन खर्च आणि हमीभावाचा अभाव यामुळे शेतकरी पुरता कोलमडला आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या या आर्थिक संकटाची गंभीर दखल घेऊन तातडीने मदत व उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. संतू रायते यांच्या पार्थिवावर खडक माळेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ व बहीण असा परिवार आहे.




