पंचाळे | वार्ताहर | Panchale
सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) फरदापुर (Fardapur) येथील बोराडे दाम्पत्याने नैराश्यातून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना आज (दि.२२) रोजी घडली. किरण अशोक बोराडे (वय ३० वर्ष) व दिपाली किरण बोराडे (वय २७) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. या दाम्पत्याने फरदापूर भोकणी फाटा (Bhokani Phata) रस्त्यालगत असलेल्या उगले यांच्या विहिरीत उडी (Jump Into The Well) घेऊन आत्महत्या केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बोराडे दाम्पत्याला पाच वर्षाची मुलगी असून दोन दिवसापूर्वी त्यांनी या मुलीला (Girl) दिपालीच्या माहेरी घोटी येथे पाठवून दिले होते. त्यानंतर मानसिक नैराश्य, आर्थिक चणचण आणि बँकेचे कर्ज यामुळे शनिवारी रात्री जेवण झाल्यानंतर मध्यरात्री रविवारी पहाटे तीन वाजता घराशेजारी असणाऱ्या एका विहिरीमध्ये दोघांनीही एकत्र आत्महत्या केली. यावेळी सकाळी गव्हाला पाणी भरण्यासाठी आलेल्या एका शेतकऱ्याने विहिरीजवळ कान टोपी, चुनापुडी व दोघांच्या चपला पाहिल्यानंतर त्यांनी पोलीस पाटलांना (Police Patil) या घटनेची माहिती दिली.
त्यानंतर पोलीस पाटील यांनी वावी पोलीस ठाण्याला (Vavi Police Station) सदर घटनेची माहिती कळवली. यावेळी वावी पोलीस ठाण्याचे एपीआय गणेश शिंदे, पीएसआय प्रमोद सरवार, हवालदार अमोल गोडे, रत्नाकर तांबे, कैलास गोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन सिन्नर फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून विहिरीतून या दोघांचे मृतदेह (Dead Body) बाहेर काढले. यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सिन्नर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. त्याठिकाणी शवविच्छेदन झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता या दाम्पत्यावर फरदापुर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, मयत बोराडे यांचा विवाह सात वर्षांपूर्वी झाला असून त्यांना पाच वर्षाची मुलगी आहे. आत्महत्या केलेल्या बोऱ्हाडे. दाम्पत्याच्या (Couple) पश्चात मुलगी,आई-वडील ,भाऊ असा परिवार आहे. तसेच आत्महत्येपूर्वी या दाम्पत्याने एक चिठ्ठी लिहिली असून त्यात आमच्या पश्चात मुलीला जमीन द्या, मुलीला जीव लावा, असा मजकूर लिहिलेला आहे. तर पोलिसांनी (Police) ही चिठ्ठी पुराव्याकामी जप्त केली असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.