नाशिक | प्रतिनिधी | Nashik
एकाच दिवशी, वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या (Police Station) हद्दीत तीन तरुण मुलांनी गळफास घेऊन आयुष्य संपवल्याच्या घटनांनी नाशिक शहर (Nashik City) हळहळले. विशेष म्हणजे, तिन्ही घटनांमध्ये मृत तरुणांचे वय १९ ते २९ च्या दरम्यान (तिशीच्या आत) असून, आत्महत्येची वेळ, पद्धत आणि ऐन उमेदीच्या वयात घेतलेला हा टोकाचा निर्णय यामुळे पोलीस तपासासमोर आव्हान उभे आहे. ही योगायोगाने घडलेली घटना आहे की या तिन्ही प्रकरणांमागे मानसिक नैराश्य, सायबर/आर्थिक विळखा अथवा कोणताही अदृश्य समान धागा आहे, या दृष्टीने आता पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.
आजकालच्या तरुण पिढीत ऑनलाइन (Online) गेमिंग, कर्ज अॅप्सचा विळखा किंवा सोशल मीडियावरून होणारे ब्लॅकमेलिंग यांमुळे आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या तिन्ही तरुणांच्या मोबाईल फॉरेन्सिक तपासणीतून काही धक्कादायक माहिती समोर येते का, याकडे मृतांचे नातलग व मित्रपकिवाराचे लक्ष आहे. जेलरोडमधील बालाजी नगर येथील कृष्णा पंढरीनाथ खाडे (वय २९) याने गुरुवारी (दि. १) पहाटे घरातील लोखंडी पाईपला ओढणीने गळफास घेतला. वडिलांनी त्याला बिटको रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉ. तेजस्विनी अंभोरे यांनी मृत घोषित केले. नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद झाली आहे.
तसेच, लहवित येथील नवरा नवरी मळा येथील प्रदीप कांतीलाल लहारे (वय १९) या तरुणाने घरी गळफास लावून घेतला. त्याला कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल देवळाली कॅम्प येथे दाखल केले असता डॉ. रूपाली राठोर यांनी मृत घोषित केले. देवळाली कॅम्प पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. तर, इंदिरानगरच्या नरहरीनगरातील सप्तशृंगी कृपा इमारतीत राहणाऱ्या सागर राधाकृष्ण सांगळे (वय २३) याने पहाटे बेडरूममध्ये सीलिंगच्या हुकाला ओढणी बांधून आत्महत्या केली. भावाने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. इंदिरानगर पोलीस तपास करत आहेत.




