नांदगाव | प्रतिनिधी | Nandgaon
फोनद्वारे आणि प्रत्यक्ष शारिरीक सुखाची मागणी करुन तसेच दिलेल्या मानसिक त्रासाला व धमक्यांना कंटाळून तालुक्यातील वंजारवाडी (Vanjarwadi) येथील प्रेमीयुगलाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या (Suicide) केली आहे. पोलिसांकडे (Police) मयत महिलेच्या भावाने गोविद नवनाथ मिटके, वय २७ वर्षे, धंदा शेती, (रा. भाटगाव, ता. येवला,) पोलिसात तक्रार दाखल केली असून, या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मयत महिलेने लिहलेल्या चिठ्ठीवरून तिच्या भावाने पोलिसात फिर्याद दाखल केली असून त्यांनी आपल्या फिर्यादीत एकूण सोळा जणांचा उल्लेख केला आहे. त्यात तिघा महिलांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. मयत महिलेच्या (Woman) भावाने दिलेल्या फिर्यादीत मयत महिलेने लिहलेल्या चिट्ठीचा उल्लेख केला त्यात असे म्हटले आहे की, आमच्यातील संबंधाचा गावातील कोणालाही काहीही त्रास होत नाही, परंतु काही लोक हे १५ ते २० दिवसापासुन आमचे मागे लागले होते व आम्हाला बोलत होते कि, तुम्ही दोघे आत्महत्या करा, नाहीतर आम्ही तुम्हांला मारुन टाकु. असा दम देत होते. आम्हांला जगण्याची खुप इच्छा होती परंतु चिठ्ठीत नावे असलेल्या लोकांनी धमकी दिल्यामुळे त्यांच्या त्रासाला कंटाळुन आम्ही आत्महत्या करत आहोत.
या घटनेतील महिला आशा कर्मचारी असून तिचे गावातील ज्ञानेश्वर माधव पवार याच्याशी प्रेमसंबध होते. या प्रेम संबंधाला गावातीलच काही मंडळींचा विरोध होता. तिने ज्ञानेश्वरशी प्रेम संबंध तोडून टाकावे म्हणून गावातील काही मंडळींचा प्रयत्न सुरु होता. जर प्रेम संबंध तोडले नाही तर जगू देणार नाही, आत्महत्या करा अशा धमक्या दिल्या जात होत्या. या त्रासाला कंटाळून या प्रेमी युगलाने तालुक्यातील नस्तनपूर जवळील रेल्वे ट्रॅकवर धावत्या रेल्वेखाली मंगळवारी (दि. ११ ) रात्री स्वतःला झोकून देत आत्महत्या केली. या घटनेत एकूण १६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर अन्य संशयितांचा शोध सुरु असून मयत महिलेवर तिच्या येवला तालुक्यातील (Yeola Taluka) माहेरी तर तिच्यासोबत आत्महत्या करणाऱ्या ज्ञानेश्वर माधव पवार याच्यावर वंजारवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, मयत महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या भावाला लिहीलेल्या पत्राचा फोटो व्हॉटसअपवर (WhatsApp) पाठविला त्यानंतर आत्महत्या केली. ज्या धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली तिच्या चालकाने हा प्रकार स्टेशन मास्तरला कळविल्याची प्राथमिक माहिती आहे. तर याप्रकरणी नांदगाव पोलिसांत भारतीय न्याय संहिता कलम १०८,३५१,(२),(३),३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि संतोष बहाकर अधिक तपास करीत आहेत.
आत्महत्या करण्यापुर्वी चिठ्ठीत लिहिली १६ जणांची नावे
प्रेम युगलांनी आत्महत्या करण्यापुर्वी चिठ्ठीत अरुण/ मधुकर रामा गायकवाड , संदिप वाल्मीक सावंत, प्रकाश वाल्मीक सावंत , नवनाथ मारुती जाधव , संतोष माधव पवार , अनिल राधु दखने, संजय मारुती सोनवणे, रोहिदास मारुती सोनवणे, सोपान सुर्यभान गुंडगळ,सुनित्ता ज्ञानेश्वर पवार ,सोनल संतोष पवार, जन्याबाई छबु गुंडगळ, नितीन सुभाष घाडगे, रा. मनमाड ता. नांदगाव जि. नाशिक सतिष/बाल्या दत्तु जाधव,बाळु सटवा गोसावी, छगन दादा साठे यांनी वेळोवेळी आम्हांला धमकी देऊन आम्ही तुम्हांला मारुन टाकुन नाहीतर तुम्ही आत्महत्या करा अशी धमकी दिल्याने मी व माझा प्रियकर ज्ञानेश्वर माधव पवार असे आत्महत्या करत आहोत, असे चिठ्ठीत म्हटले आहे.