नाशिक । प्रतिनिधी
महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षेसाठी राज्यातून डीटीएड, बीएडधारकांचा कल यंदा वाढला आहे. दोन्ही पेपरला 3 लाख 43 हजार 264 उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केला आहे. राज्य परीक्षा परिषदेतर्फे ‘महाटीईटी’ 19 जानेवारी 2020 रोजी घेण्यात येणार आहे.
यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दि. 8 ते 28 नोव्हेंबरदरम्यान करण्यात आली. प्राथमिक (पेपर-1), माध्यमिक (पेपर-2) अशा दोन स्तरावर डीटीएड, बीएडधारकांकडून अर्ज मागवण्यात आले असून यंदा मागील वर्षीच्या तुलनेत अर्जांची संख्या वाढली आहे. मुदतवाढीच्या मागणीला नकार देण्यात आला. ऑनलाईन अर्ज भरलेल्या 3 लाख 43 हजार 264 पैकी सर्वाधिक अर्ज प्राथमिक स्तरासाठी (पेपर-1) आलेले आहेत. पेपर-1 साठी 1 लाख 88 हजार 678 तर पेपर-2 साठी 1 लाख 54 हजार 586 अर्ज आले आहेत.
राज्यात शिक्षक भरतीसाठी डिसेंबर 2013 पासून ‘टीईटी’ बंधनकारक करण्यात आली आहे. एका वर्षात दोन परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले परंतु तसे झाले नाही. शिवाय 2010 पासून शिक्षक भरती रखडल्याने परीक्षेकडे कल कमी राहिला. तीन वर्षांपूर्वी पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली. सुरुवातीला अडचणीत सापडलेली ही प्रक्रिया दोन महिन्यांपूर्वी मार्गी लागली.
पहिल्या टप्प्यात 5822 उमेदवारांची निवड यादी झाली. मागील महिन्यात ‘टीईटी’ परीक्षेचे वेळापत्रक आले. नऊ वर्षांनंतर शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झाल्याने ‘टीईटी’कडे कल वाढल्याचे दिसते. गेल्यावर्षी पावणेतीन लाख विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेने दिली.