Friday, May 3, 2024
Homeब्लॉगBlog : माझ्या जीवनातील नाशिक पर्व

Blog : माझ्या जीवनातील नाशिक पर्व

नाशिकमधील (Nashik) माझ्या वास्तव्याची दोन पर्वे! जून १९६० ते मे १९६१ या कालखंडात मी नाशकातील एचपीटी कॉलेजमध्ये (HPT College) व्याख्याता होतो. हे पहिले पर्व! नाशिकमधील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा (YCMOU) मी मे १९९५ ते ऑगस्ट १९९६ या कालावधीत कुलगुरू होतो. ते दुसरे पर्व!…

ही हकिगत आहे ती या दुसऱ्या पर्वाची! व्याख्यात्याच्या नोकरीची १२ वर्षे पूर्ण झाल्यावर जून १९७३ मध्ये मी परभणीचे शिवाजी कॉलेज सोडले व औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठात नोकरी स्वीकारली. तिथे साधारणपणे ६ वर्षे काम केल्यावर मी ऑगस्ट १९७९ ला ते विद्यापीठ सोडले आणि पुणे विद्यापीठात (Pune University) आलो. माझी प्रपाठकाची जागा प्रारंभी हंगामी होती, पण ती लवकरच कायम स्वरूपी झाली.

- Advertisement -

मी मूळचा पुण्याचा (Pune) आणि पुणे विद्यापीठाचाच विद्यार्थी! त्यामुळे पुणे विद्यापीठातील बरेचसे प्राध्यापक आणि प्रशासकीय सेवक माझ्या पूर्व परिचयाचे होते. त्यामुळे अल्पकाळातच मी तिथे चांगलाच रुळलो. अभ्यास मंडळाचा अध्यक्ष, सामाजिक शास्त्रे विद्याशाखेचा आधिष्ठाता, विद्वतसभा व कार्यकारिणीचा सदस्य अशा विविध पदांवर मी काम केले. विद्यापीठाच्या विविध समित्यांचा सदस्य वा अध्यक्ष म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली. वर्षांमागून वर्षे गेली. कामांत वैविध्य असल्याने ती करताना कंटाळवाणे वगैरे काही वाटले नाही.

१९९७ च्या सुरुवातीला पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंची (Vice-Chancellor) मुदत संपली. नव्या कुलगुरुसाठी नियुक्त केलेल्या शोध समितीने त्या पदासाठी शिफारशीत केलेल्या उमेदवारांच्या नावांत माझेही नाव होते. त्यावेळी डॉ. पी. सी. ॲलेक्झांडर हे महाराष्ट्राचे राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती होते. त्यांनी शिफारशीतांच्या मुलाखती घेतल्या. त्यातील जागतिक किर्तीचे संशोधक डॉ. वसंतराव गोवारीकर यांची कुलगुरूपदी नियुक्ती केली.

आपली निवड झाली नाही याचे मला फारसे वाईट वाटले नाही. त्याची कारणे दोन. त्यांतील एक म्हणजे डॉ. गोवारीकरांसारखा ज्येष्ठ शास्त्रज्ञ विद्यापीठाला कुलगुरू म्हणून लाभला. दुसरे कारण थोडेसे व्यक्तिगत होते. ज्या आसनावर या आगोदर डॉ. जयकर, डॉ आप्पासाहेब परांजपे, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांसारख्या मातब्बर व्यक्ती बसल्या होत्या, त्यावर आपण बसणे कितपत योग्य होईल? हा प्रश्न मनात ताणतणाव निर्माण करीत होता. नेमणूक न झाल्याने मला मोकळे-मोकळे वाटायला लागले.

मध्यंतरीच्या काळात नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. राम ताकवले यांनी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू पद स्वीकारल्याने नाशिकच्या विद्यापीठाचे कुलगुरूपद रिक्त झाले होते. या विद्यापीठाच्या कुलगुरू शोध समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या यादीतही माझे नाव समाविष्ट झाले होते. परंतु मी तिथे जाण्यास फारसा उत्सुक नव्हतो.

एक दिवस मी माझ्या कार्यालयात काम करीत बसलो असताना ज्यांचे नाव नाशिक विद्यापीठासाठीच्या शिफारशीतांच्या यादीत होते असे एक गृहस्थ मला भेटायला आले होते. गप्पांच्या ओघात ते मला म्हणाले, तुम्ही नाशिकला जायला फारसे उत्सुक नाहीत, असे मी ऐकले आहे. तसे असेल तर तुम्ही मला काही मदत करू शकाल का? मी त्यांना काही तरी गुळमुळीत उत्तर देण्याच्या तयारीत असताना टेलिफोनची घंटा वाजली. ऑपरेटरने राजभवनातून माझ्यासाठी फोन आहे असे सांगितले.

राजभवनामधून राज्यपालांचे सचिव बोलत होते. त्यांनी माझ्या घरचा फोन नंबर मागून घेतला व मला घरी जायला सांगितले. त्यांना माझ्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे होते. घरी त्यांचा फोन आला. ते म्हणाले, तुम्ही मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नाशिकला जायला तयार आहात का? हे माननीय राज्यपालांनी मला आपणास विचारायला सांगितले आहे. तुमचा होकार असेल तर तुमची पुन्हा मुलाखत न घेता येत्या ३-४ दिवसांत तुमच्या नियुक्तीचा आदेश निघू शकेल. त्यावर मी त्यांना म्हणालो, पुणे विद्यापीठाचा कुलगुरू होणे मला आवडले असते. नाशिकला जायला मी फारसा उत्सुक नाही. थोडे थांबून ते गृहस्थ समजूत घालण्याच्या सुरात मला म्हणाले, डॉ भोईटे, हे तुम्हाला सन्मानपूर्वक दिलेले निमंत्रण आहे.

राज्यपालांच्या कार्यालयातून कोणाला अशा पदांसाठी असे निमंत्रण सहसा पाठवले जात नाही. तुम्ही ते स्वीकारावे व राज्यपालांच्या निमंत्रणाचा मान ठेवावा, असे मला वाटते. त्यावर मी विचार करायला थोडा वेळ मागितला. राज्यपाल एका समारंभासाठी पुण्यात आले होते. (बहुदा वसंत व्याख्यानमालेच्या उद्घाटनासाठी!) ते सायंकाळी ६-७ च्या सुमारास मुंबईला परत जाणार होते. त्याअगोदर त्यांना माझे उत्तर हवे होते. मी काही मित्रांशी व सौंशी विचारविनिमय केला. सायंकाळी त्यांचा फोन आल्यावर माझा होकार त्यांना मी सांगितला. दिनांक ३ मे १९९७ रोजी नाशिकच्या नेमणुकीचा आदेश आला. दिनांक ८ मे रोजी मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा आधिभार स्वीकारला.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना १ जुलै १९८९ रोजी झाली होती. डॉ राम ताकवले त्या विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू! त्या विद्यापीठाच्या आराखड्याचे ते प्रमुख शिल्पकार होते. एक प्रयोगशील शिक्षणतज्ञ ही त्यांची ठळक ओळख. ज्यांना प्रतिकूल परिस्थितीमुळे वा अन्य कारणांमुळे शिक्षण घेणे शक्य झाले नाही त्यांना ते घेण्याची संधी उपलब्ध करून देणे ही या विद्यापीठाची कार्यप्रणाली! या विद्यापीठाची संकल्पना, रचना व कार्यपध्दती पारंपारिक विद्यापीठापासून अगदी वेगळी! दिनांक ७ जानेवारी १९९७ रोजी डॉ ताकवले यांनी ते विद्यापीठ सोडले.

त्यांच्या या साडेसहा वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असंख्य अडचणींना तोंड देत, परिश्रमपूर्वक विद्यापीठ उभे केले होते. त्यांच्या कार्यकाळात विद्यापीठाच्या निरनिराळ्या इमारती उभ्या राहिल्या होत्या. स्वयंअध्ययनासाठी आवश्यक असलेली विविध अभ्यासक्रमांची पुस्तके तयार झालेली होती. महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागात विद्यापीठाची विभागीय कार्यालये आणि अभ्यास केंद्रे कार्यान्वित झाली होती.

डॉ. ताकवले यांनी विद्यापीठाच्या निरनिराळ्या शैक्षणिक व प्रशासकीय विभागांची उभारणी करण्यासाठी आवश्यक असलेला अनुभव व क्षमता असलेले मनुष्यबळ जमा केले होते. विद्यापीठाचा प्रशासकीय आकृतीबंध नीटसा तयार झालेला नसल्याने नेमणुकासहित कांही बाबतीत तात्पुरतेपणा आला होता. विद्यापीठाच्या नोकरीत आलेल्यांपैकी काही जण सेवानिवृत्त होवून आलेले होते. काही जणांकडे आवश्यक ती शैक्षणिक पात्रता नव्हती. काही जण वाढीव पगाराच्या वा बढत्यांच्या अपेक्षेने हातातल्या नोकऱ्या सोडून आले होते.

स्थानिकांना नोकऱ्या आणि बढत्या यात प्राधान्य हवे होते. विद्यापीठाच्या निरनिराळ्या विभागातील सेवकांनी आपआपल्या संघटना स्थापन केलेल्या होत्या. बाहेरच्या आणि स्थानिक कामगार नेत्यांनी त्यांना बळ देण्यात पुढाकार घेतला होता.

मी रुजू झालो तेव्हा वातावरण बरेच तापलेले होते. मी प्रथम लोकांच्या गटवार भेटी घेतल्या. त्यांचे प्रश्न समजावून घेण्याचा प्रयत्न केला. मागण्या अनेक व विविध प्रकारांच्या होत्या. त्यातील ज्या सोडवण्याजोग्या होत्या, त्यांना मी प्रथम हात घातला, पण काही मागण्या मान्य केल्या की लगेच दुसऱ्या मागण्यांसाठी आग्रह धरला जायचा. बऱ्याच मागण्यांची माझ्या पातळीवर पूर्तता होणे केवळ अशक्य होते.

काहींच्या कोर्ट-कचेऱ्या चालू होत्या. विद्यापीठाच्या कायद्यात विद्यापीठाला ठराविक रक्कम शासनाकडून अनुदान म्हणून मिळण्याची तरतुद होती. अधिकच्या खर्चासाठी विद्यापीठाने स्वतःचा निधी उभारावा अशी अट होती. त्यामुळे काम करताना अनेक अडचणी निर्माण होत होत्या. प्रश्न सोडवण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करीत आहे, असा विश्वास सर्वांच्या मनात निर्माण होऊ लागला होता. आश्वासक अशी परिस्थिती निर्माण होत होती. परंतु ती कधीही स्फोटक होऊ शकेल, अशी माझ्या मनात भिती होती.

शैक्षणिक व प्रशासकीय विभागांमध्ये वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ व विधायक वृत्तींचे काही लोक होते. आपण आततायीपणा करून काहीही साध्य होणार नाही, आपण एकत्रितरित्या बळ देवून विद्यापीठ स्थिर केले तरच आपल्या प्रश्नांचे निराकरण होवू शकेल हा विचार ते इतरांना पटवून देण्याचा प्रयत्न करीत होते.

दरम्यान, मी सातत्याने पत्रव्यवहार करून येथील परिस्थितीचे गांभीर्य आणि उपाययोजना करण्याची आवश्यकता याकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत होतो, पण त्याचा काहीही परिणाम होण्याची चिन्हे दिसत नव्हती. आपण यापेक्षा काही तरी अधिक प्रभावी असे करणे आवश्यक आहे असे मला वाटले आणि तशी संधी मला मिळाली.

विद्यापीठाचा पदवीदान समारंभ बराचसा लांबला होता. विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता जाणवू लागली होती. पदवीदान समारंभास मुख्यमंत्री मुख्य पाहुणे म्हणून आले तर त्यांना विद्यापीठाची होत असलेली बहुआयामी प्रगत वाटचाल दाखवता येईल, त्याचप्रमाणे विद्यापीठाचे प्रश्नही त्यांच्यापुढे मांडता येतील, असा विचार माझ्या मनात आला. त्यावेळी महाराष्ट्रात युतीचे सरकार होते. शिवसेनेचे मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.

दरम्यानच्या काळात ते एका खाजगी कार्यक्रमासाठी नाशिकला आले होते. मी त्यांना भेटलो. लेखी निमंत्रण दिले. ते नक्की येतो म्हणाले. परंतु नंतर पाठवलेल्या रीतसर निमंत्रणाला व स्मरणपत्रांना त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटी मी त्यांना टाईप न केलेले, स्वतःच्या अक्षरातील एक लांबलचक पत्र पाठवले. त्यात त्यांच्या विद्यापीठ भेटीची आवश्यकता विस्ताराने प्रतिपादली होती.

पुढे असेही लिहिले होते की, आपण न आलात तर विद्यापीठाला यशवंतराव चव्हाणांचे नाव दिलेले आहे, त्यामुळे मुख्यमंत्री विद्यापीठाला भेट देण्याचे टाळत आहेत, असा त्याचा चुकीचा अन्वयार्थ लावला जाईल. आलात तर विद्यापीठाला यशवंतराव चव्हाणांचे नाव दिलेले असले तरी मुख्यमंत्र्यांनी आपपर भाव दाखवता विद्यापीठाला भेट दिली, असा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचेल. पत्राची भाषा आग्रही होती. आठ दिवसांच्या आत मुख्यमंत्र्यांचा होकार आला. त्यांनी तारीखही दिली.

सर्व मंडळी उत्साहाने कामाला लागली. समारंभ देखणा व भारदस्त झाला. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात विद्यापीठाच्या सर्व प्रश्नांमध्ये लक्ष घालीन आणि ते सोडवण्याचा कसोशीने प्रयत्न करीन, असे भरघोस आश्वासन दिले. कुलगुरूंच्या अत्यंत आग्रही निमंत्रणामुळे, बाकीची कामे बाजूला ठेवून मी या समारंभासाठी आलो आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. एखाद्याचे मन वळवण्यासाठी आर्जवी पत्र कसे लिहावे याचा कुलगुरूंचे पत्र हे एक उत्कृष्ट नमुना होता, असे माझ्या पत्राबद्दल त्यांनी गौरवोग्दार काढले.

परंतु, नंतर स्मरणपत्रे पाठवूनही आश्वासनपूर्तीच्या दिशेने काहींच होत नव्हते. मी शेवटी सचिवालयात जावून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. ते म्हणाले, तुमचे प्रश्न सोडवतो असे आश्वासन मी दिले असले तरी सर्वच प्रश्न लगेच सोडवणे शक्य नाही. तुमचा मुख्य प्रश्न अनुदानविषयक आहे. त्याचा विचार करण्यासाठी मी एक कमिटी नेमतो. त्याप्रमाणे त्यांनी त्यावेळचे शिक्षण संचालक सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नियुक्त केली.

मी क्रमाक्रमाने विद्यापीठाच्या कार्य विस्ताराचे नवनवीन उपक्रम हाती घेतले. नवे अभ्यासक्रम सुरू केले. ताकवल्यांच्या कार्यकाळात विद्यापीठात कृषी विज्ञान केंद्र हा एक अभिनव उपक्रम होता. मी त्याला बळ दिल्याने त्याने चांगलेच बाळसे धरले होते. भाषांतर विद्येवरचे एक चार दिवसांचे चर्चासत्र आयोजित केले. त्यासाठी बाहेरचे नामवंत लोक आले होते. अशा उपक्रमांमुळे बाहेरच्या विद्वत जगतात विद्यापीठाची ओळख निर्माण होऊ लागली होती. विरोधाचा वा संघर्षाचा मार्ग धरण्यापेक्षा सहकार्याची भूमिका घेण्यात आपले हित आहे हे विद्यापीठातील सर्वांच्या लक्षात येवू लागले होते. अर्थात याला काही जण अपवाद होते. परंतु, त्यांची संख्याही हळूहळू कमी होत गेली.

नाशिककरांची मूळ मागणी नेहमीच्या पारंपारिक विद्यापीठाची होती. परंतु त्यांना मिळाले ते मुक्त विद्यापीठ; त्यामुळे लोकांमध्ये थोडीशी नाराजी होती. सुरुवातीच्या काळात एक वार्ताहर मला भेटायला आले होते. ते म्हणाले, तुमची आणि आम्हा नाशिककरांची अवस्था सारखीच आहे. आम्हाला नेहमीच्या विद्यापीठाऐवजी मुक्त विद्यापीठ मिळाले. दुधाची तहान ताकावर भागवावी लागली. तुमची स्थितीही तशीच. तुम्हाला पुणे विद्यापीठ हवे होते, परंतु मिळाले मुक्त विद्यापीठ! मी त्यांना त्यावेळी समर्पक असे उत्तर दिले.

नाशिककरांची विद्यापीठाविषयीची नाराजी दूर व्हावी व त्यांच्या मनात विद्यापीठाबद्दल आपुलकी निर्माण व्हावी यासाठीही मी प्रयत्न सुरू ठेवले. त्रासाचे होत होते, तरीही आलेली बाहेरची सर्व निमंत्रणे मी स्वीकारली. विद्यापीठाचे काही कार्यक्रम शहरात आयोजित केले. स्थानिक संस्थांच्या सहकार्याने आयोजित केलेली लोककला परिषद त्यावेळी चांगलीच गाजली. सर्व उपक्रमांमध्ये विद्यापीठातील सर्वांचे चांगले सहकार्य मिळाले. मंडळी वस्तुतः चांगली होती, पण अनिश्चितता आणि इतर अडचणींमुळे जरा वेगळी होती.

मध्यंतरी एकदा माननीय शरद पवार नाशिकला आले होते. त्यांनी मला भेटण्यासाठी बोलावले. विद्यापीठाबद्दल विचारले. मी त्यांना विद्यापीठाचे काही प्रश्न सांगितले. त्यावर ते म्हणाले, सुरू केलेले हे विद्यापीठ कधीही बंद पडणार नाही. धीर धरा, काम करा, सर्व काही ठीक होईल. मी त्यांना विद्यापीठ भेटीचे निमंत्रण दिले. ते म्हणाले, पुढे केव्हातरी येईन.

सुरुवातीच्या काळात विद्यापीठ परिसरात अगदी मोजकेच लोक राहत होते. सायंकाळी सहानंतर आणि सुट्टीच्या दिवशी परिसरात अगदी शुकशुकाट असे. त्यावेळी जीव घेणारे एकाकीपण जाणवायचे. सुट्टीच्या दिवशी बोलण्यासाठी ड्रायव्हर आणि घरात काम करणाऱ्या नोकराशिवाय अन्य कोणीही उपलब्ध नसे. त्याच्याबरोबरचे संभाषणही चहा आण, जेवायला वाढ, एवढ्यापुरतेच मर्यादित असे. एकदा रात्रीच्या वेळी परिसरात वाढलेल्या गवताला आग लागली. गवत वाळलेले; त्यामुळे आग वेगाने पसरली.

पुस्तकांच्या गोदामांपर्यंत ती जाते की काय अशी भीती वाटायला लागली. आजुबाजूच्या वस्त्यांमधील लोकांनी ती विझवली. मी ताबडतोब कुलसचिव आणि इतर काहींना परिसरात राहणे सक्तीचे केले. काही घरगुती अडचणींमुळे सौ. भोईटे नाशिकला येवून राहू शकत नव्हत्या. मला एकटे राहणे प्रकृतीच्या कारणामुळे अडचणीचे होते. तथापि, मी येथे राहण्याचे निश्चयपूर्वक ठरवले होते.

मध्यंतरीच्या काळात पुण्याच्या भारती विद्यापीठ या ख्यातनाम शिक्षण संस्थेच्या एका शाखा समुहाला भारत सरकारने अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्रदान केला. त्या संस्थेचे सर्वेसर्वा डॉ. पतंगराव कदम आणि त्यांचे बंधू डॉ. शिवाजीराव कदम यांच्याशी माझे घनिष्ठ संबंध होते.

त्यांनी एका रविवारी पत्रकार परिषद घेवून माझे नाव त्यांच्या नव्या विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून घोषित केले. त्या अगोदर त्यांनी माझी नाममात्र पूर्वसंमती घेतली होती. त्या पदासाठी इतर काही मातब्बर इच्छूक असताना त्यांनी माझी निवड केली होती. याचे माझ्यावर बरेच दडपण आलेले होते. तसेच इतरही कारणे होती. म्हणून मी ते कुलगुरुपद स्वीकारावयाचे ठरवले.

योगायोगाने राज्यपाल डॉ. अलेक्झांडर त्यावेळी पुण्यात होते. मी दुसऱ्या दिवशी सकाळी माझे राजीनामापत्र देण्यासाठी त्यांना भेटलो. त्यांच्या ऑफिसमध्ये पाऊल टाकताच ते म्हणाले, तुम्ही का आला आहात हे मला माहीत आहे. मी आजच्या वर्तमानपत्रात तुमची बातमी वाचली आहे. तुमचा राजीनामा स्वीकारण्याशिवाय मला पर्याय उरलेला नाही. तुम्ही ताबडतोब नाशिकला जावून तेथील रेव्हेन्यू कमिशनरांना तुमचा पदभार द्या. मी तशी व्यवस्था केली आहे. तुम्ही जाता आहात ती संस्था विरोधी पक्षाच्या एका नेत्याची आहे. उगाच काही अडचणी निर्माण व्हायला नकोत.

मी दुसऱ्या दिवशी नाशिकला जावून विद्यापीठाचे कुलगुरुपद सोडले. त्या दिवशी तारीख होती ६ ऑगस्ट १९९६. नाशिक आणि मुक्त विद्यापीठ सोडून आता दोन दशकांहून अधिक कालखंड लोटला आहे. तरीही नाशिक शहर, विद्यापीठ परिसर व विद्यापीठातील सहकारी यांच्या विषयीच्या आठवणी माझ्या मानात अजून सचेतन आहेत.

गंगापूर धरणाचा (Gangapur Dam) विशाल जलविस्तार, सलग गोलाकार दिसणारे आकाश, सर, पदवीदान समारंभासाठी तुम्हाला बंद गळ्याचा कोट शिवायलाच हवा, असे म्हणत माझ्या विरोधाला न जुमानता मला अट्टाहासाने शिंप्याच्या दुकानात घेऊन जाणारे प्रेमळ सहकारी, त्यांनी आयोजित केलेला भावपूर्ण निरोप समारंभ, त्यात प्रा. जोशी आणि इतरांनी केलेली भावनापूर्ण भाषणे… सर्व काही मला आठवते आहे.

एका अर्थाने कसोटीच्या असलेल्या त्या काळात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज, प्रसिध्द उद्योगपती देवकिसन सारडा, खासदार डॉ वसंतराव पवार, गांवकरीचे दादासाहेब पोतनीस यांनी मला दिलेला नैतिक पाठिंबा माझे आत्मबळ वाढवणारा होता. निरोप घ्यायला गेलो असताना कुसुमाग्रज म्हणाले, उत्तमराव, तुम्ही आणखी थोडे थांबायला हवे होते. त्यांनी स्वाक्षरी करून दिलेली त्यांच्या ‘नटसम्राट’ नाटकाची प्रत मी एक मौल्यवान ठेवा म्हणून जपून ठेवली आहे. माझी जन्मतिथी १४ मे! गेली अनेक वर्षे १३-१४ च्या मध्यरात्री देविकिसन सारडा भाऊंचा न चुकता आशीर्वादाचा फोन येतो आणि माझा वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू होतो.

विद्यापीठातील डॉ. नागेश भदाणे , डॉ. सूर्या गुंजाळ, डॉ रमेश वरखेडे, डॉ भोंजाळ इत्यादी सहकाऱ्यांच्या बरोबर अधूनमधून गप्पागोष्टी होत असतात. कर्मचाऱ्यांपैकी सुनंदा मोरे, ओक, हिरे, कैलास शिंदे, सुनिल बर्वे यांच्याबरोबरही अधूनमधून संपर्क होतो. माझ्या मनात अद्यापही दोन कारणांमुळे खंत भावना आहे. एक, निरोप समारंभात प्रा. जोशी म्हणाल्याप्रमाणे विद्यापीठाचे विमान टेक ऑफ अवस्थेत असताना मी ते मध्येच सोडले. दोन, राज्यपाल डॉ. ॲलेक्झांडर यांनी मोठ्या विश्वासाने माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी पूर्ण पार न पाडता विद्यापीठ सोडले. असो!

एका योगायोगाचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो. माझ्या नाशिकमधील वास्तव्याची दोन पर्वे, १५ जून १९६० ला सुरू झालेले आणि मे १९६१ मध्ये संपलेल्या पहिल्या पर्वात मी नाशिकच्या एचपीटी कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून प्राध्यापकी व्यवसायाची सुरुवात केली आणि तब्बल ३६ वर्षांनी १४ मे १९९६ रोजी मुक्त विद्यापीठाचा कुलगुरू असताना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्याने शासकीय नियमांनुसार मी प्राध्यापकी व्यवसायातून निवृत्त झालो. जिथे सुरुवात तिथेच शेवट! एक विलक्षण योगायोग!

– डॉ. उत्तम भोईटे, ९૮२२० ५२६१४

- Advertisment -

ताज्या बातम्या