Monday, June 24, 2024
Homeनाशिकवाढत्या अपघातांमुळे वाहतूक वळविली; 'ती' वाहतूक वडाळा गावातूनच

वाढत्या अपघातांमुळे वाहतूक वळविली; ‘ती’ वाहतूक वडाळा गावातूनच

नाशिक। प्रतिनिधी

- Advertisement -

पुणे व सिन्नरकडून येणारी अवजड वाहने द्वारका सिग्नलऐवजी वडाळा गावातून जात असल्याने होणाऱ्या अपघातांमुळे पुन्हा द्वारकामार्गे उड्डाणपूलावरुन मुंबईकडे मार्गस्थ करण्याचा निर्णय झाला आहे. महिन्याभरासाठी प्रायोगिक तत्वावर वाहतूक पोलिसांनी हा निर्णय लागू केला आहे. परंतु, मुंबईकडून पुणे-सिन्नरकडे जाणारी अवजड वाहने वडाळा गावामार्गेच पाठविली जाणार आहे. ही अधिसूचना वाहतूक विभागाचे पाेलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी लागू केली आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपूलावरुन तसेच राष्ट्रीय महामार्गावरुन येणाऱ्या अवजड वाहनांमुळे द्वारका सिग्नलजवळ वाहतूक कोंडी व्हायची. त्यामुळे सन २०२० मध्ये द्वारकाऐवजी वडाळा गावामार्गे अवजड वाहने मार्गस्थ करण्याचा निर्णय झाला. तरीही द्वारका चौकातील कोंडी फुटलेली नाही. दुसरीकडे वडाळा गावातून मार्गस्थ होणाऱ्या अवजड वाहनांमुळे रहिवाशी क्षेत्रात गंभीर अपघात झाल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे या परिसरातून होणारी अवजड वाहतूक रोखण्याची मागणी नागरिकांनी केली. पोलिसांनी आठ दिवस सदर वाहतूक वळवली. हा प्रयोग काहीसा फायदेशीर ठरत असल्याने पुढील महिनाभर त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे जूनपर्यंत अवजड वाहने आता द्वारका चौकातून मार्गस्थ होणार आहेत. या अभ्यासानंतर सदर निर्णय कायम ठेवायचा की, त्यामध्ये पुन्हा बदल करायचे, हे स्पष्ट होणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

असा आहे बदल

सिन्नर-पुणे बाजूने मुंबईकडे जाणारी अवजड वाहतूक पूर्वी विजय ममता सिग्नलवरुन वडाळा, इंदिरानगर, पाथर्डीमार्गे मुंबईकडे जात होती. आता नव्या अधिसूचनेनुसार विजय ममता (फेम) सिग्नलवरुन काठेगल्ली सिग्नल, द्वारका सिग्नलवरुन डावीकडे वळून रॅम्पने उड्डाणपूलावरुन मुंबईकडे मार्गस्थ हाेईल. तर मुंबईकडून सिन्नर-पुणे अवजड वाहतूक ही पाथर्डी फाटा, इंदिरानगर, वडाळा, डीजीपी नगर, सम्राट सिग्नलमार्गे सिन्नर-पुण्याच्या दिशेने जाईल.

  • ५ मे पासून ३ जून २०२४ पर्यंत प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी
  • रात्री दहा ते सकाळी आठपर्यंत परवानगी
  • सकाळी आठ ते रात्री दहापर्यंत अवजड वाहतूक बंद
  • ‘डायव्हर्जन पॉइंट’वर वाहतूक व स्थानिक पोलिस
  • नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
- Advertisment -

ताज्या बातम्या