नाशिक । प्रतिनिधी
शहरातील रविवार कारंजा ते सांगली बँक सिग्नल या काही दिवसांपूर्वी दुहेरी केलेल्या मार्गावर दोन्ही बाजूंनी अस्ताव्यस्त पार्क केलेल्या वाहनांमुळे दररोज क्षणाक्षणाला वाहतुकीचा गोंधळ उडून वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. परंतु वाहतूक पोलिसांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.
शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत त्र्यंबकनाका ते अशोक स्तंभ या स्मार्टरोडचे काम गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे. या मार्गाच्या संथगतीने होणार्या कामामुळे नाशिककर वेठीस धरले गेल्याची भावना आहे. काही दिवसांपूर्वी या मार्गाचे काम पूर्ण होऊन वाहतूकही सुरू झाली होती. मात्र पुन्हा चौकांचे सुशोभिकरण करण्यासाठी सीबीएस चौक बंद करण्यात आला होता. आता काही दिवसांपूर्वी अशोक स्तंभ येथील चौकाचे सुशोभिकरणाचे काम सुरू करण्यात आल्याने या चौकातील वाहतूक बंद आहे.
या मार्गावरून रविवार कारंजाकडे जाणार्या वाहतुकीला पर्याय म्हणून पोलीस प्रशासनाने रविवार कारंजा ते सांगली बँक सिग्नल यापूर्वी एकेरी असलेल्या मार्गावर बॅरिकेडस् लावून दुहेरी वाहतूक सुरू केली आहे. मुळात हा मार्ग अरूंद आहे. या मार्गावरून एका बाजूने एकावेळी एकच वाहन जाते, मात्र असे असातानाही दोन्ही बाजूंनी दुचाकी, रिक्षा, टेम्पो, कार अशी वाहने गर्दीने रस्त्याच्या कडेला पार्क केलेली असतात.
मुळात अरूंद मार्ग त्यात दुतर्फा पार्क केलेली वाहने, याच मार्गावर असलेले पाच ते सहा बसथांबे यामुळे एखादी बस थांबली की रस्त्यात मध्यभागी थांबते. गर्दीचा मार्ग असल्याने बसच्या मागे लगेच मोठी रांग लागते. अशात रिक्षाचालक, दुचाकीस्वार आडवी वाहने घालत असल्याने या दोन्ही मार्गाने वाहन चालवणे तारेवरची कसरत ठरत आहे.
या मार्गाच्या रविवार कारंजा तसेच सांगली बँक सिग्नल या दोन्ही टोकांना दररोज चार ते पाच वाहतूक पोलीस कार्यरत असतात. हाकेच्या अंतरावर होणारी वाहतूक कोंडी दिसूनही याकडे सर्व पोलीस दुर्लक्ष करून आपले सावज हेरण्यात व दंड वसूल करण्यात व्यस्त असतात. यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. या मार्गावर मध्यभागी बसथांब्याजवळ वाहतूक पोलिसाची नियुक्ती करून रस्त्याच्या कडेला वाहने पार्क करणार्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.