Saturday, January 24, 2026
HomeनाशिकNashik-Trimbakeshwar Kumbhmela 2027 : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा तयारी संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी...

Nashik-Trimbakeshwar Kumbhmela 2027 : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा तयारी संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले महत्वाचे निर्देश

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील धार्मिक परंपरेचे दर्शन घडावे यासाठी नाशिकजवळील भागात एक मोठे महाकुंभ तयार करावे. या महाकुंभामध्ये देशातील तसेच राज्यातील मंदिरे, तीर्थक्षेत्रे, सांस्कृतिक वारशाचे भाविकांना दर्शन घेता येईल, असे मोठे संमेलन केंद्र उभारावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे दिल्या. नाशिकला जागतिक पटलावर आणण्यासाठी, अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कुंभमेळ्याचे ब्रॅण्डींग करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

- Advertisement -

सन २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने पूर्वचर्चा तसेच तयारीसंदर्भात फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. या बैठकीत फडणवीस यांनी यांनी कुंभमेळ्यातील वाहतूक व्यवस्था, गर्दीचे नियोजन, साधुग्राम, नदी आणि उपनद्यांचे शुद्धीकरण, पायाभूत सुविधा तसेच इतर अनुषंगीक विकास कामे आदींबाबतचा आढावा घेतला.

YouTube video player

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

नाशिक – त्र्यंबकेश्वर रीलिजियस कॉरीडॉरची निर्मिती करून नाशिक ‘रीलिजिअस हब’ म्हणून विकसित करावे. प्रयागराजच्या धर्तीवर सुरक्षित कुंभमेळा होण्यासाठी नियोजन करावे. गोदावरी नदीकाठ विकासासाठी प्रोत्साहन द्यावे. नाशिक येथील प्रमुख मंदिरांच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी. नाशिक येथे साधुग्रामसाठी अतिरिक्त जमिनीची आवश्यकता असल्याने तेथील जमीन संपादित करण्यात यावी. येथे नगररचना परियोजन करून हस्तांतरणीय विकास हक्क स्थापित करून ते नगरपालिकेकडे हस्तांतरीत करावे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी अतिक्रमण आहेत, अशा ठिकाणची अतिक्रमण तत्काळ हटवावीत, अशा सूचना फडणवीस त्यांनी केल्या.

कुंभमेळ्यासाठी देशविदेशातून पर्यटक दर्शनसाठी येत असतात. पर्यटक तसेच भाविकांच्या सोयीसाठी नाशिक येथे ८ ते १० हेलिपॅड तयार करण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, समृद्धी महामार्गाने येणाऱ्या भाविकांसाठी इगतपुरी ते नाशिक हा मार्ग प्रशस्त करून नाशिक शहराला जोडणाऱ्या सर्व मार्गांचे क्राँक्रीटीकीकरण तसेच रूंदीकरण करण्यात यावे. जे मार्ग २०२७ पर्यंत बांधणे शक्य आहे, असेच बांधकाम हाती घेण्यात यावे. इगतपुरी ते त्र्यंबकेश्वर हा रस्ता चारपदरी करण्यात यावा. वाढवण, मुंबई, शिर्डी, छत्रपती संभाजीनगर येथून नाशिककडे येणारे रस्ते तसेच रिंग रोड आदी रस्ते अद्ययावत करण्यात यावे. नागरिक तसेच भाविकांच्या सुविधेसाठी राम काल पथ बरोबरच त्र्यंबकेश्वर येथे रीलिजिअस कॉरीडॉर तयार करण्यात यावा.

सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील भाविकांच्या सुरक्षेसंदर्भात पोलीस विभागाकडून आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी पोलीसांच्या निवासाची योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर जागोजागी लागणारे सीसीटीव्ही, बॅरिकेंटींग, सार्वजनिक ध्वनिक्षेपण यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

साधुग्रामकरिता संपादित केलेल्या जागेवर वृक्षतोड न करता साधुंच्या निवासाची व्यवस्था करावी. कुंभ परिसरात पाणी स्वच्छ राहील, याची विशेष दक्षता घ्यावी. मुबलक प्रमाणात प्रसाधन गृहे तयार करण्यात यावीत. जलपर्णीबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करा. तसेच कुंभमेळ्यादरम्यान कुठेही चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी विशेष व्यवस्था करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत केल्या.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

या बैठकीला आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव गोविंदराज, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सविव मनीषा म्हैसकर, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी तसेच नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच अधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’चे दिमाखदार उद्घाटन

0
नाशिक | प्रतिनिधी Nasik नाशिकमधील घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरणाऱ्या दैनिक ‘देशदूत’ आयोजित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चे आज (दि. २३ जानेवारी) उत्साही...