त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar
दिवाळीच्या (Diwali) सुट्ट्यांमुळे सोमवार, मंगळवार आणि बुधवार या तीन दिवसांत त्र्यंबकेश्वरमध्ये दीड लाखांहून अधिक भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. मात्र, सिंहस्थ कुंभमेळ्याचा कालावधी सुरू असतानाही या भाविकांपैकी दहा टक्के भाविकांनी देखील गोदावरीचे उगमस्थान मानल्या जाणाऱ्या कुशावर्त तीर्थाला भेट दिली नसल्याचे चित्र समोर आले आहे. भाविकांचा बहुतांश वेळ त्र्यंबकेश्वर मंदिरातील दर्शनाच्या रांगा आणि मंदिर परिसरातच जात असल्याने कुशावर्त तीर्थाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
३१ ऑक्टोबर रोजी कुशावर्त तीर्थावर (Kushavart Kund) सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा पार पडला. कुंभमेळा कालावधी सुरू होऊन दहा दिवस उलटले असतानाही कुशावर्त तीर्थावर अपेक्षित भाविकांची वर्दळ दिसून येत नाही. यामागे भाविकांच्या दर्शन व्यवस्थेचे नियोजन आणि तीर्थक्षेत्राकडे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या मार्गदर्शनाचा अभाव ही प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जात आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये येणाऱ्या भाविकांकडे साधारण सहा ते सात तासांचा वेळ उपलब्ध असतो. मात्र, वाहनतळांची रचना प्रामुख्याने त्र्यंबकेश्वर मंदिराकडे (Trimbakeshwar Temple) जाण्याच्या दृष्टीने करण्यात आली आहे.
मंदिरातील दर्शनासाठी (Darshan) दोनशे रुपयांचे तिकीट घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांना मंदिर परिसरातच तिकीट उपलब्ध होत नाही. त्यासाठी वाहनतळ किंवा देवस्थानच्या शिवप्रसाद इमारतीत जावे लागते. तिकीट काढणे, रांगेत उभे राहणे, दर्शन घेणे आणि बाहेर पडणे या प्रक्रियेतच भाविकांचे सहा ते सात तास खर्च होतात. त्यामुळे वेळेअभावी अनेक भाविक कुशावर्त तीर्थाला भेट देत नसल्याचे चित्र आहे.
कुशावर्त तीर्थाचे महत्त्व भाविकांपर्यंत पोहोचविण्याची गरज
शास्त्रानुसार प्रथम गोदावरीच्या कुशावर्त तीर्थावर वंदन करून त्यानंतर त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी जाण्याची परंपरा आहे. त्यामुळे भाविकांना या धार्मिक परंपरेची माहिती मिळणे आवश्यक आहे. मंदिर परिसरात कुशावर्त तीर्थाचे महत्त्व सांगणारे माहिती फलक लावावेत. तसेच कुशावर्त तीर्थाकडे जाणाऱ्या मार्गांवर ठळक आणि दिशादर्शक फलक उभारावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.त्र्यंबकेश्वर नगरपरिषद, गंगा-गोदावरी मंदिर ट्रस्ट आणि त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
भाविकांना प्रथम कुशावर्त तीर्थावर जाऊन गोदावरीचे वंदन करता येईल आणि त्यानंतर त्र्यंबकेश्वर मंदिरात शास्त्रशुद्ध पद्धतीने दर्शन घेता येईल, असे नियोजन प्रशासनाने करावे. हजारो रुपये खर्च करून आणि लांबचा प्रवास करून भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये येतात. अशा वेळी त्यांना केवळ मंदिराचे दर्शन न होता कुशावर्त तीर्थाचे धार्मिक महत्त्व अनुभवण्याची संधीही मिळाली पाहिजे. त्यासाठी मंदिर आणि तीर्थक्षेत्र दर्शनाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.




