नाशिक | Nashik
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा गुरुवार (दि.४) अखेरचा दिवस असल्याने ही लढत दुरंगी होणार की, तिरंगी याचे चित्र स्पष्ट होणार आहे. या जागेसाठी नऊ उमेदवार रिंगणात आहे. या जागेसाठी महायुतीतर्फे शिवसेना शिंदे गटाकडून नरेंद्र दराडे (Narendra Darade) उमेदवार आहेत. त्यांच्याबरोबरच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांनी बंडखोरी करत महायुतीलाच थेट आव्हान दिले आहे.
या जागेसाठी आग्रही असलेल्या भाजपकडून माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते (Ganesh Gite) त्यांचे बंधू गोकुळ गिते (Gokul Gite) आणि ज्येष्ठ नेते प्रसाद हिरे यांनी अर्ज दाखल केले आहेत. अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके आणि जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे यांनीही अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक चुरशीची झाली आहे. महायुतीचे नरेंद्र दराडे, इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंबली ऑफ महाराष्ट्रचे मोहम्मद खालील अब्दुल रशीद, कुणाल दराडे, परवेज कोकणी, गणेश गिते, गोकुळ गिते, प्रसाद हिरे, गोरख बोडके व विष्णुपंत म्हैसधुणे हे अपक्ष उमेदवार (Candidate) रिंगणात आहेत.
गणेश गिते माघार घेणार?
भाजपचे माजी नगरसेवक गणेश गिते यांच्या उमेदवारीने महायुतीचे डोकेदुखी चांगलीच वाढली होती. मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी काल (बुधवारी) नाशिकमध्ये माध्यमांशी बोलतांना मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास असून ते गणेश गिते यांना समजावून सांगतील आणि अर्ज मागे घेण्याबाबत चर्चा करतील, असे म्हटले होते. यानंतर मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीला अखेर यश आले असून, त्यांचे निकटवर्तीय समजले जाणारे गणेश गिते हे निवडणुकीतून माघार घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
गोकुळ गितेंची समजूत काढण्यासाठी गणेश गिते मैदानात
मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गणेश गिते यांनी जरी विधानपरिषद निवडणुकीतून माघार घेण्याची तयारी दर्शवली असली तरी त्यांचे बंधू गोकुळ गिते हे अजूनही निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळे आता गणेश गिते हे स्वतः आपले बंधू गोकुळ गिते यांची समजूत काढणार असल्याचे बोलले जाते. गोकुळ यांना विरोधकांनी पाठिंबा देण्याची तयारी दर्शविल्याने महायुतीमधील शिंदे सेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंधु गोकुळ गिते यांची समजूत काढण्यात गणेश गिते यांना यश येते का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.




