नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी (Nashik Vidhan Parishad Election) आज (दि. १८) सकाळी ८ वाजेपासून जिल्ह्यातील (District) विविध मतदान केंद्रांवर मतदानास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांच्या प्रतिष्ठेची लढाई पाहायला मिळणार आहे. दरम्यान बुधवारी सायंकाळपर्यंत सर्व ९ मतदान केंद्रांवर बॅलेट पेपर व मतदान साहित्य कडेकोट पोलीस बंदोबस्तात पोहोचवण्यात आले होते.
या निवडणुकीत महाविकास आघाडीने (ठाकरे गट) अधिकृत उमेदवार उभा न केल्यामुळे ही लढत प्रामुख्याने महायुती (Mahayuti) अंतर्गत आणि बंडखोरांभोवती फिरत राहिली आहे. निवडणुकीच्या रिंगणात महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे (शिवसेना शिंदे गट) यांच्याबरोबरच मतपत्रिकेवर गोकुळ गिते (भाजप बंडखोर /अपक्ष) आणि प्रसाद हिरे (भाजप बंडखोर) यांचीही नावे राहणार आहेत.
भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे (Prasad Hire) यांनी माघार घेतली आहे, तसेच अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनीही वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर आपला प्रचार थांबवून महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, कायदेशीर मुदतीनंतर या घडामोडी घडल्यामुळे होणाऱ्या मतदानाच्या मतपत्रिकेवर गोकुळ गिते आणि प्रसाद हिरे यांची नावे कायम असणार आहेत. यामुळे पसंतीक्रमाची मते फुटण्याची धास्ती महायुतीला सतावत आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने नाशिकच्या राजकारणात मोठे फेरबदल पाहायला मिळाले. राजकीय वैर विसरून मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. नाशिक जिल्ह्यात महायुतीकडे (भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट) सुमारे ४५० हून अधिक मतदारांचे स्पष्ट संख्याबळ आहे. संख्याबळ अनुकूल असले तरी ऐनवेळी होणारा संभाव्य दगाफटका आणि अंतर्गत नाराजी टाळण्यासाठी महायुतीने आपल्या मतदारांना सुरक्षित स्थळी (सहलीवर) रवाना करण्याची खबरदारी घेतली आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवार रिंगणात उतरवला नसला, तरी महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आणि बंडखोरांच्या नावांचा मतपत्रिकेवरील प्रभाव लक्षात घेता ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. महायुतीमधील नाराज मतदारांच्या मतांचा कौल आपल्या बाजूने कसा वळवता येईल, यासाठी मविआच्या नेत्यांनी पडद्यामागे रणनीती आखल्याचे बोलले जाते. महायुती आपले संख्याबळ टिकवून नरेंद्र दराडेंना विजयी करणार की मतपत्रिकेवरील बंडखोरांची नावे आणि गुप्त मतदानाची पद्धत नवा ट्रिस्ट आणणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
दरम्यान मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वाँच राहणार असून या केंद्रांचे वेब कास्टिंग देखील करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने एकीकडे राजकीय घडामोडी घडत असतांना दुसरीकडे प्रशासनातर्फे निवडणुकीची तयारी पूर्ण करण्यात अली आहे. जिल्ह्यात दोन महानगरपालिका, एक कॅन्टॉन्मेंट बोर्ड, ११ नगरपरीषद, ६ नगरपंचायतीचे सदस्य मतदान प्रक्रियेत सहभागी होतील. जिल्ह्यात ९ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे.
अशी आहे मतदारसंख्या
नाशिक महापालिका १२२, भगूर नगरपरिषद २३, देवळाली छावणी परिषद १, दिंडोरी नगरपंचायत १९, पेठ नगरपंचायत १८. इगतपुरी नगरपरिषद २४, त्र्यंबकेश्वर नगरपरिषद २३, निफाड नगरपंचायत १९, पिंपळगाव बसवंत नगरपरिषद २९, ओझर नगरपरिषद २८, सिन्नर नगरपरिषद ३४, येवला नगरपरिषद ३०, नांदगाव नगरपरिषद २३, मनमाड नगरपरिषद ३५, मालेगाव महापालिका ८४, चांदवड नगरपरिषद २३, देवळा नगरपंचायत १८, कळवण नगरपंचायत १९, सुरगाणा नगरपंचायत १९, सटाणा नगरपरिषद २८
विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाची तयारी पूर्ण झाली असून सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. ६१९ मतदारांसाठी ९ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहे. मतदान हे बॅलेट पेपरवर होणार असून मतदारांना पसंतीक्रमाने मतदान करावे लागेल. मतदान केंद्रांवर पोलिस बंदोबस्ताचेही नियोजन करण्यात आले आहे.
आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी
या ठिकाणी पार पडणार मतदान
मतदान केंद्राची इमारत – मतदार क्षेत्र
नाशिक तहसील कार्यालय – नाशिक, भगूर, दे.छावणी परिषद
दिंडोरी तहसील कार्यालय – दिंडोरी, पेठ
इगतपुरी तहसील कार्यालय – इगतपुरी, त्र्यंबकेश्वर
निफाड तहसील कार्यालय- निफाड, पिंपळगाव बसवंत, ओझर, सिन्नर नगरपरिषद
येवला तहसील कार्यालय – येवला, नांदगाव मनमाड नगरपरिषद
मालेगाव तहसील कार्यालय – मालेगाव महापालिका
चांदवड तहसील कार्यालय – चांदवड नगरपरिषद
कळवण तहसील कार्यालय – कळवण, सुरगाणा नगरपंचायत
बागलाण तहसिल कार्यालय – सटाणा नगरपरिषद




