Thursday, November 14, 2024
Homeनगर‘नगर लोकसभे’च्या अडचणीमुळे नाशिकवरून मिळणार साडेचार हजार मतदान यंत्रे

‘नगर लोकसभे’च्या अडचणीमुळे नाशिकवरून मिळणार साडेचार हजार मतदान यंत्रे

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन लागले तयारीला || 40 दिवसांत मतदान यंत्रांची होणार प्रथमस्तरीय तपासणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पुढील दोन ते तीन महिन्यांत राज्यात विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांसोबत निवडणूक यंत्रणा आणि प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हा प्रशासन तयारीला लागले आहे. येत्या 27 ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर त्यानंतर कधीही विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार गुरूवार (दि.1) पासून जिल्हा निवडणूक विभागाने नगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघनिहाय आवश्यक असणार्‍या मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी सुरू केली आहे. येत्या 40 दिवसांत ही तपासणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, अहमदनगर लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे खा. नीलेश लंके यांनी भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांचा पराभव केलेला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर केेंद्रीय निवडणूक आयोगाने विहीत पध्दतीने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार डॉ. विखे पाटील यांनी नगर लोकसभा मतदारसंघातील 40 मतदान केंद्रातील मतमोजणीची पडताळणी व्हावी, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शुल्कास अर्ज केलेला आहे. तसेच याप्रकरणी न्यायालयात देखील धाव घेतलेली आहे. यामुळे जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी नगर लोकसभा मतदारसंघात वापरलेली मतदान यंत्रे वगळून शिर्डी लोकसभा मतदारसंघासह नाशिकवरून मतदान यंत्रणाची मागणी करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी नाशिकवरून 4 हजार 435 मतदान यंत्रे उपलब्ध करण्यात येणार असल्याचे निवडणूक विभागाच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.

गुरूवारी सकाळी नगर एमआयडीसीच्या वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत प्रभारी जिल्हाधिकारी आशिष येरेकर, प्रभारी उपजिल्हाधिकारी निवडणूक शाहुराज मोरे, उपजिल्हाधिकारी चंद्रशेखर देशमुख, प्रदीप पाटील यांच्यासह तहसीलदार शंकर रोडे यांच्यास निवडणूक विभागाच्या कर्मचारी यांच्या देखरेखेखाली शिर्डी लोकसभा निवडणुकीत वापरलेल्या मतदान यंत्रणाची तपासणी सुरू करण्यात आली. नगर जिल्ह्यात बेल कंपनीने मतदान यंत्राचा पुरवठा केलेला असून या कंपनीचे इंजिनिअर देखील यावेळी उपस्थित होते. येत्या 10 सप्टेंबरपर्यंत नगर जिल्ह्यात आवश्यक असणार्‍या 12 विधानसभा मतदारसंघासाठी आवश्यक असणार्‍या आणि अतिरिक्त ठरवून दिलेल्या राखीव कोठ्यानूसार मतदार यंत्रे तपासून निवडणुकीसाठी सज्ज ठेवण्यात येणार आहे.

नगर जिल्ह्यात विधानसभेच्या 12 जागांसाठी 8 हजार 542 बीयु, 4 हजार 789 कंट्रोल युनिट आणि 5 हजार 155 व्हिव्ही पॅटची गरज आहे. मात्र, यात नगर लोकसभा मतदारसंघातील मतदान यंत्र न्यायप्रविष्ठ असल्याने ती वापरता येणार नाहीत. यामुळे नाशिकवरून विभागीय आयुक्त यांच्या पातळीवरून मतदान यंत्रणाची मागणी करण्यात आलेली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि राखीव कोठ्यातील मतदान यंत्रे सध्या नगरच्या वाखर महामंडळाच्या गोडावूनमध्ये असून त्या यंत्राची तपासणी करण्यात आलेली आहे. तसेच प्रत्यक्षात निवडणुकीसाठी आणि राखीव असे मतदार यंत्र (बीयू, सीयू आणि व्हीव्ही पॅट) लवकरच उपलब्ध होणार असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.

नाशिकवरून मिळणारे यंत्रे
जिल्ह्यात प्रत्यक्षात आवश्यक असणारी आणि राखीव अशा 127 टक्के बीयू, 127 टक्के सीयू आणि 137 टक्के व्हीव्ही पॅट मशिनचा कोटा पूर्ण करण्यात येणार आहे. 2 हजार 793 बीयू, 1 हजार 284 सीयू आणि 1 हजार 358 व्हीव्ही पट अशी यंत्रे जवळपास 4 हजार 435 यंत्रे ही नाशिकवरून उपलब्ध होणार असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. पुढील 40 दिवस म्हणजेच 10 सप्टेंबरपर्यंत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान यंत्रणांची तपासणी पूर्ण करण्यात येणार आहे.

नगर लोकसभेचे पडसाद अद्याप सुरू
नगर लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर लागलेला निकाल यांचे पडसाद अद्याप उमटत असून मतमोजणीनंतर विखे यांनी 40 मतमोजणी केंद्रातील मतमोजणीवर आक्षेप घेतल्याने जिल्हा निवडणूक विभागाची अडचण झाली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने जोपर्यत त्याचा निकाल लागणार नाही. तोपर्यंत नगर लोकसभा निवडणुकीतील मतदान यंत्रणाला हात लावता येणार नसल्याने आता जिल्ह्यासाठी नाशिकवरुन मतदान यंत्रे मागणवण्यात येणार आहेत.

दररोज 225 यंत्रांची तपासणी
विधानसभा निवडणुकीची चाहूल लागल्याने राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 12 विधानसभा निवडणुकीसाठी आवश्यक असणार्‍या मतदान यंत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. पुढील 40 दिवस म्हणजेच 10 सप्टेंबरपर्यंत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान यंत्रांची तपासणी पूर्ण करण्यात येणार आहे. दररोज साधारपणे 200 ते 225 मतदान यंत्रांची तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या