नाशिक । प्रतिनिधी Nashik
मुंबईचा प्रवास कमी झाल्यामुळे त्याचा फायदा पुण्याला मोठ्या प्रमाणावर झाला. त्या तुलनेत नाशिकचा विकास कमी झाला. मात्र आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचा मोठ्या प्रमाणावर विकास होणार आहे. जेएनपीटी बंदरासह वाढवण बंदराला जाण्यासाठी नाशिक येथून ग्रीनफिल्ड रोड तयार करणार असल्याने त्याचा खूप मोठा फायदा नाशिक शहराला मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
सीआयआय यंग इंडियन्सच्या नाशिक शाखेतर्फे पश्चिम क्षेत्र परिषदेच्या तीन दिवसीय बैठकीचा समारोप आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संवादाने झाला. सीआयआयचे राष्ट्रीय अध्यक्ष तरंग खुराणा आणि माध्यमकर्मी आनंद नरसिंहन यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
प्रयागराज येथे महाकुंभासाठी 15 हजार हेक्टर जागा आहे. तर नाशिकमध्ये 300 एकरमध्ये कुंभमेळा करावा लागतो. तरीही हा कुंभ यशस्वी होतो. याचे श्रेय साधू-संत व आखाड्यांना जाते. या वेळचा कुंभमेळा तंत्रज्ञान व आस्था यांचा असणार आहे. येणारा सिंहस्थ अध्यात्माचा एक नवा अध्याय असणार आहे. यात एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. प्रयागराज येथील कुंभमेळ्यात त्याचा वापर केला गेला.
प्रयागराज मध्ये 50 कोटी भाविकांनी स्नान केले. मात्र कुणीही कुणाला कुठल्या धर्माचा, जातीचा, पंथाचा, गरीब, श्रीमंत, भाषा याची विचारणा केली नाही. येथे केवळ आणि केवळ फक्त आस्था होती. नाशिकच्या सिंहस्थातही आस्थाच असणार आहे. सिंहस्थाच्या तयारीची गाडी उशीरा सुटली असली तरी त्या गाडीला आता वेग देण्यात आला आहे. त्यासाठी नाशिकचे प्रशासकीय अधिकारी चांगले काम करीत आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
नाशिकमध्ये औद्योगिक विकासाची मोठी क्षमता आहे. येथील मनुष्यबळ आणि हवामान लक्षात घेता पर्यटन आणि औद्योगिक विकासाला भरपूर वाव आहे. एचएएलमुळे डिफेन्स इकोसिस्टम येथे आहे. मुंबईचा फायदा पुणे, छत्रपती संभाजीनगर शहरांना झाला. समृद्धी महामार्गामुळे आता नाशिकचा अधिकगतीने विकास होणार आहे. देशातील सर्वात मोठे बंदर आता वाढवण येथे होत आहे.
नाशिक येथून वाढवणसाठी ग्रीनफिल्ड रोड तयार करणार असल्याने त्याचा खूप मोठा फायदा नाशकाला मिळेल. नाशिकची ओळख प्रगत शेतीसाठी आहे. जिल्हा द्राक्षे, कांदे, भाजीपाला उत्पादनत आघाडीवर आहेत. भारताच्या जीडीपी वाढीत यापूर्वी नाशिकच्या कृषी क्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता व यापुढेही राहील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्यासह दीपक बिल्डर्सचे दीपक चंदे, यंग इंडियन्सच्या पश्चिम क्षेत्राचे अध्यक्ष कृणाल शहा, वेदांत राठी, नाशिक शाखेचे संस्थापक अध्यक्ष जनक सारडा, नाशिक शाखेचे अध्यक्ष हर्ष देवधर, पारुल धाडीच, भाविक ठक्कर उपस्थित होते.