नाशिक | Nashik
उत्तर भारतातून उत्तर दिशेने येणारे थंड वारे राज्यात प्रवेशातांना दीड किमी उंचीपर्यंत ताशी २५ ते ३० किमी वेगाने वाहणाऱ्या पूर्वीय वाऱ्यात मिसळून महाराष्ट्रात लोटले जात आहेत. त्यामुळे थंडी वाढतच राहणार आहे. आज पहिल्यांदा यंदाच्या हिवाळ्यात नाशिकचे किमान तापमान १०.८ अंशांवर आले. त्यामुळे नाशिककर थंडीने गारठले.
तसेच, उत्तर भारतातील जम्मू काश्मीर, लेह-लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड तसेच सिक्कीमसारख्या समशितोष्ण कटिबंधातील अक्षवृत्तांदरम्यान परंतु उच्च तपाम्बर पातळीतील म्हणजे समुद्र सपाटीपासून साडेबारा किमी उंचीवरील सातत्याने टिकून असलेले सध्यः काळातील ताशी २७५ किमी गतीने वाहणारे वेगवान पश्चिमी वाऱ्यांचे झोत आणि वायव्य आशियातून, आपल्याकडे सध्या उत्तर भारतात नियमितपणे एकापाठोपाठ मार्गक्रमण करणारे पश्चिमी प्रकोप या तिन्हीच्या एकत्रित परिणामांमुळे महाराष्ट्रात वारा वहनातून, सध्या जाणवत असलेले थंडीचे सातत्य अजूनही पुढील पाच दिवस १ डिसेंबरपर्यंत असेच टिकून राहणार आहे.
दरम्यान, सध्याच्या स्थितीतील थंडीत कदाचित किंचित अधिक वाढही होऊ शकते. सध्या मुंबईसह कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात दुपारचे कमाल तापमान २८ तर पहाटेचे किमान तापमान १२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असून दोन्हीही तापमाने भागपरत्वे सरासरीपेक्षा दोन ते चार अंशाने खालावलेले आहेत, असे हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी म्हटले आहे.
निफाडचे तापमान ८.३ अंशावर
‘
जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून निफाडचा (Niphad) पारा आज ८.३ अंशावर पोहचला आहे. नाशिक आणि निफाडचे किमान तापमान राज्यातील नीचांकी तापमान ठरले आहे. यासोबतच यंदाच्या हिवाळी हंगामातही आतापर्यंतच्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा