नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिककर (Nashik) सध्या थंडीच्या लाटेचा अनुभव घेत आहेत. काल (दि.१७) रोजी पहाटे पाच वाजेचे नाशिकचे किमान ९.४ तर निफाडचे (Niphad) ६.१ अंश इतके तापमान होते. त्यानंतर आज तापमानात घसरण झाली असून नाशिकचा पारा ८.० आणि निफाडचा ५.७ अंशांवर (Degrees) पोहोचला आहे. सध्या जाणवत असलेली अपेक्षित थंडी बुधवार (दि.१८) पर्यंत टिकून राहण्याची शक्यता कायम आहे.
पश्चिमी चक्रवादळामुळे (Western Cyclone) उत्तरेकडून १४ ते १५ किलोमीटर ताशी वेगाने थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे शहरात रात्री कडाक्याच्या तर दिवसा बोचऱ्या थंडीचा अनुभव येत आहे. शहरातील मोकळी मैदाने, नदीकाठ, नाले, शेती मळे परिसर असलेल्या भागात रात्रीच्या वेळी थंडी अधिक जाणवते. तापमान घसरल्याने शहरात थंडी वाढली आहे. विशेषतः गोदाकाठ परिसरातील जुने तपोवनरोड नाशिक, आनंदवली, गोवर्धन शिवार, म्हसरूळ, पाथर्डी फाटा परिसर, गोविंदनगर, गंगापूर रोड, आडगाव या भागात सर्वाधिक गारठा जाणवत आहे.
दरम्यान, थंडीपासून (Cold) संरक्षण करण्यासाठी नागरिक शेकोट्या पेटवत असून द्राक्षबागांना (Vineyards) शेकोटीची ऊब दिली जात आहे. तर सकाळी भरणाऱ्या शाळांमध्ये उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र चांगलीच वाढली आहे. निफाड तालुक्यात (Niphad Taluka) थंडीचे प्रमाण वाढल्याने द्राक्ष बागांच्या शेंड्यांच्या वाढीवर परिणाम होऊन मावा, तुडतुडे यांचा प्रादुर्भाव वाढला आहे.