नाशिक | प्रतिनिधी | Nashik
बांगलादेशी तसेच काही रोहिंग्या नागरिकांना मालेगाव येथून बनावट जन्म प्रमाणपत्र दिल्याच्या गंभीर आरोप झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाने याची दखल घेत तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे (IG Dattatraya Karale) हे राहणार आहेत.
मालेगाव शहरात (Malegaon City) संशयित व्यक्ती व काही कुटुंबांना एका महिन्यात सर्वाधिक जन्म दाखले देण्यात आल्याचा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. जन्म दाखले वितरित केलेल्या काही व्यक्तींचे पत्तेही नसल्याची बाब उघड करून त्यांनी या प्रकरणी राज्य सरकारने एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली होती.
त्यानुसार राज्य शासनाने (State Government) याची दखल घेत विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. ही समिती या बनावट जन्म दाखल्यांबाबत तक्रारींची चौकशी करून आपला आलेल्या अहवाल देणार आहे. मालेगाव प्रमाणेच अमरावती येथील आरोपांची तपासणी करण्यासाठी एसआयटी नेमल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
एसआयटीत या सदस्यांचा समावेश
विशेष चौकशी पथकाचे अध्यक्ष म्हणून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक असून मालेगावचे अतिरिक्त अधीक्षक हे सचिव राहतील. तर समिती सदस्य म्हणून विभागीय आयुक्त कार्यालयातील नगरविकास शाखेचे विभागीय सहआयुक्त व नाशिकचे अतिरिक्त जिल्हाधिकारी (Collector) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.