नाशिक | Nashik
जिल्हा परिषदेच्यावतीने (Zilla Parishad) येत्या रविवारी (दि.१४) एकल महिलांच्या पुर्नविवाहासाठी सर्व जातीय, मोफत वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, जिल्हा परिषदेने केलेल्या एकल महिलांच्या (Ekal Woman) सर्वेक्षणातून जिल्ह्यात तब्बल ९४ हजाराहून अधिक एकल महिला असल्याचे समोर आले आहे. या एकल महिलांशी विवाह करण्याची तयारी ८ हजार पुरुषांनी दर्शवली आहे. त्यामुळे नियोजित मेळावा हा पुढे ढकलण्यात आला आहे. टप्याटप्याने हा मेळावा आता ऑनलाईन घेतला जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी दिली.
मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात नाशिक जिल्ह्यात (Nashik District) तब्बल ९४ हजार ९८५ महिला एकल असल्याचे आढळून आले. या एकल महिलांशी विवाह करण्यासाठी ८ हजार पुरुषांनी तयारी दर्शवल्याची बाब समोर आली आहे. त्या तुलनेत दुसरीकडे एकल महिलांची संख्या मात्र अत्यल्प आहे. जिल्हा परिषदेच्या नव चेतना अभियानाच्या माध्यमातून एकल महिलांच्या सामाजिक, मानसिक व आर्थिक पुनर्वसनाला चालना देण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला असला तरी त्यातून भीषण वास्तव समोर आले आहे. पुनर्विवाहासाठी इच्छुक असलेल्या एकल महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पुरुषांनी नोंदणी केली. पण, महिलांचा अजूनही फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
पंच्याण्णव हजार एकल महिला
जिल्हा परिषदेने घेतलेल्या पुढाकाराने जिल्ह्यातील एकल महिलांचे पहिल्यांदाच व्यापक सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यात तब्बल ९४ हजार ९८५ एकल महिला आढळून आल्या आहेत. हे सर्वेक्षण अद्याप पूर्ण झालेले नसल्याने ही संख्या लाखाच्या वर जाण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. सर्वेक्षणात आढळलेल्या एकल महिलांमध्ये सर्वाधिक म्हणजे ८९,३७४ विधवा आहेत. त्याखालोखाल २.९५८ परित्यक्ता, १,९९५ घटस्फोटित आणि ६५८ अविवाहित प्रौढ महिला (कुमारिका) आहेत. सिन्नर, इगतपुरी, निफाड आणि येवला या तालुक्यांमध्ये एकल महिलांची संख्या सर्वाधिक आहे. यापैकी ५५ वर्षांखालील सुमारे ३६ हजार महिलांसाठी रोजगार निर्मितीवर विशेष भर देण्यात येणार असून, ज्येष्ट एकल महिलांसाठी आरोग्य, मानसिक आधार आणि सुरक्षेचे विशेष कार्यक्रम राबवले जाणार आहेत.
१३,४३४ अल्पवयीन मुले अवलंबून
या एकल महिलावर १८ वर्षांखालील १३,४३४ मुले अवलंबून आहेत, त्यात ६,१७१ मुली आहेत. यांना बालसंगोपन योजनेत समाविष्ट करून दरमहा २,२५० रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
अभिनव योजना राबवणार : पवार
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एकल महिलांच्या पुनर्वसनासाठी महत्त्वाकांक्षी योजना राबवल्या जाणार आहेत. त्या खालीलप्रमाणे शून्य टक्के व्याजाने कर्ज स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्या एकल महिलेला ३०,००० पर्यंतचे कर्ज व्याजमुक्त जिल्हा परिषद व्याज भरेल.
बचत गटात समावेश
सध्या बचत गटात नसलेल्या १२,५६५ महिलांना तात्काळ बचत गटात सामील करणार किंवा नवे गट सुरू करणार. सर्व शासकीय कागदपत्रे मिळवून देणार रेशन कार्ड, आयुष्यमान कार्ड, निराधार पेन्शन आदींची पूर्तता ग्रामपंचायतीमार्फत केली जाईल.
पुनर्विवाहाला प्रोत्साहन
मुले असलेल्या एकल महिलेचा पुनर्विवाह झाल्यास, तिच्या दोन्ही मुलांच्या नावे प्रत्येकी १ लाख रुपये मुदतठेव (१८ वर्षांपर्यंत काढता येणार नाही) जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून जमा केली जाईल.
वयोगटानुसार आकडेवारी
१८-३० वर्षे: १,४६४
३१-४० वर्षे : ८,५५१
५५ वर्षांवरील : ५८,६९४
४१-५५ वर्षे : २६, २७६
तालुकानिहाय एकल महिला
| निफाड | ८७५७ |
| बागलाण | ५१०४ |
| चांदवड | ७५६१ |
| सिन्नर | ७५९४ |
| इगतपुरी | ९१९१ |
| मालेगाव | ६५२८ |
| येवला | ८८४८ |
| सुरगाणा | ६०९३ |
| नाशिक | ५१०८ |
| दिंडोरी | ३२२७ |
| कळवण | ५७५५ |
| पेठ | ३७४१ |
| त्र्यंबकेश्वर | २९७८ |
| नांदगाव | ६९०२ |
| देवळा | १६१८ |




