नाशिक | प्रतिनिधी | Nashik
राज्य शासनाची (State Government) आवश्यक परवानगी न घेता शाळा सुरू ठेवल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) प्राथमिक शिक्षण विभागाने (Education Department) जिल्ह्यातील १६ अनधिकृत शाळांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. अशा शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येऊ शकते, त्यामुळे पालकांनी तातडीने शासनमान्य शाळांमध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
नाशिक महापालिका हद्दीतील (Nashik NMC Area) आठ शाळा अनधिकृत असल्याचे समोर आल्यानंतर प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्हाभरातील शाळांच्या (District School) परवान्यांची पडताळणी केली. या तपासणीत नाशिक, बागलाण, देवळा, चांदवड, निफाड, मालेगाव आणि दिंडोरी तालुक्यांतील एकूण १६ शाळा शासनाच्या परवानगीशिवाय सुरू असल्याचे आढळून आले.
नियमानुसार इयत्ता पहिली ते सातवी, पाचवी ते आठवी तसेच आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. २०१९ पूर्वी शिक्षण विभाग, शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण संचालक कार्यालयामार्फत मान्यता दिली जात होती. मात्र, आता शाळांना ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमांतून शासनाकडे प्रस्ताव सादर करावा लागतो.
शासनाची मंजुरी मिळाल्यानंतरच शाळा सुरू करण्यास परवानगी दिली जाते. मात्र, संबंधित १६ शाळांनी ही प्रक्रिया पूर्ण न करताच शाळा सुरू ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मान्यतेचा प्रश्न भविष्यात निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे पालकांनी सावधगिरी बाळगून आपल्या पाल्यांचे प्रवेश अधिकृत परवानगीधारक शाळांमध्ये घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
शासनाच्या परवानगीविना सुरू असलेल्या शाळांना आम्ही नोटिसा बजावल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश अधिकृत परवानगी असलेल्या शाळांमध्ये स्थलांतरित करावेत.
साईलता सामलेटी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद नाशिक
नोटीस बजावण्यात आलेल्या शाळा
बागलाण तालुका
ड्रिम्स इंटरनॅशनल स्कूल, नामपूर
जिनियस किड्स अकॅडमी, नामपूर
मलबेरी बुश इंटरनॅशनल स्कूल, नामपूर
किलबिल इंग्लिश मीडियम स्कूल, नामपूर
होरायझन अकॅडमी, शेमळी
चांदवड तालुका
कंचनसुधा इंटरनॅशनल स्कूल, शिंगवे
देवळा तालुका
एव्हरग्रीन स्कूल ऑफ एक्सलन्स, दहिवड
के. बी. इंग्लिश स्कूल, खारीपाडा
अभिनव बालविकास मंदिर
नाशिक तालुका
अभिनव बालविकास मंदिर, मातोरी
चैतन्य टेक्नो स्कूल, चांदशी
निफाड तालुका
डी. व्ही. पी. मंडळ डे केअर सेंटर, नांदुर्डी
मालेगाव तालुका
मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूल, टिंगरी
दिंडोरी तालुका
किड्स टाऊना इंग्लिश मीडियम स्कूल, वलखेड फाटा
बालभारती पब्लिक स्कूल, दिंडोरी (मराठी माध्यम)
बालभारती पब्लिक स्कूल, दिंडोरी (इंग्रजी माध्यम)




