नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जिल्हा परिषद (Zilla Parishad) मुख्यालयातील वीज बिलाचा वाढता खर्च लक्षात घेता आता नव्या प्रशासकीय इमारतीत सौरऊर्जेचा (Solar Power) पर्याय स्वीकारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ३५० मेगावॅट क्षमतेची सोलर सिस्टिम बसवण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. यामुळे दरवर्षी सुमारे १६ लाख रुपयांची बचत होणार आहे.
जिल्हा परिषद नवीन इमारतीवरील सौरऊर्जा प्रकल्पामुळे वीज बिलाचा मोठा भार कमी होणार असून, प्रशासनिक खर्चात बचत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्र्यंबकेश्वर रोडवरील (Trimbakeshwar Road) एबीबी सिग्नलजवळ जिल्हा परिषदेची सहा मजली भव्य इमारत उभी राहिली आहे. या नव्या इमारतीतून पुढील आठवड्यात कामकाज सुरू होणार आहे. त्यादृष्टीने अधिकारी व कर्मचारी यांचे शिफ्टिंग अंतिम टप्प्यात आहे. या इमारतीच्या देखभाल व दुरुस्तीसाठी दरवर्षी सुमारे पाच लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने उत्पन्नाचे पर्यायी स्रोत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, जुनी इमारत (Old Bulding) ही सिंहस्थ मेळा प्राधिकरणाला भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे, तर काही जागा बँकांना भाड्याने देण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच नवीन प्रशासकीय इमारतीजवळ असलेल्या एक एकर मोकळ्या जागेचा व्यावसायिक वापर कसा करता येईल याचाही विचार सुरू आहे.
विभागप्रमुख सावध भूमिकेत
जुन्या इमारतीतील फाईल्स, कागदपत्रे आणि साहित्य नवीन इमारतीत टप्प्याटप्प्याने हलवण्याच्या सूचना सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत. महिला व बालकल्याण विभागाने काही प्रमाणात शिफ्टिंग पूर्ण केले असले तरी इतर विभागप्रमुखांनी अद्याप सावध भूमिका घेतल्याचे चित्र आहे.




