Friday, May 3, 2024
Homeनाशिकनाशिकची क्रिकेटपटू रसिका शिंदे झाली बारावी पास

नाशिकची क्रिकेटपटू रसिका शिंदे झाली बारावी पास

नाशिक | प्रतिनिधी

वर्षभर क्रिकेट सराव, फिटनेसची प्रॅक्टिस, सातत्याने राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन, कोणताही क्लास न लावता फक्त स्वयंअध्ययन आणि कॉलेजचे मार्गदर्शन या बळावर राष्ट्रीय क्रिकेटपटू रसिका प्रदीप शिंदे हिने बारावीच्या परीक्षेत विज्ञान विभागांमध्ये एकूण 89% टक्के गुण मिळवून यशाची परंपरा कायम राखली.

- Advertisement -

यापूर्वी दहावीच्या परीक्षेत सुद्धा रसिकाने शंभर टक्के गुण मिळवून राज्यात पहिला क्रमांक मिळविला होता. या वर्षी देखील सातत्याने क्रिकेटमध्ये कोणताही खंड न पाडता नियमितपणे रोज चार ते पाच तास सराव करून बारावीच्या विज्ञान विषयामध्ये अतिशय उज्ज्वल यश संपादन केले आहे.

रसिका मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालय मध्ये विज्ञान विभागात बारावी शाखेत शिक्षण घेत होती. शिक्षणासोबतच तिने क्रिकेटचा व्यासंग देखील चांगल्या पद्धतीने जोपासलेला आहे.

दररोज सकाळी आणि संध्याकाळी नियमितपणे क्रिकेटचा सराव करून विविध क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये वर्षभर सतत सहभाग घेतला. कोणतीही शिकवणी न लावता केवळ स्वतः अभ्यास करून विज्ञान सारख्या अवघड विषयांमध्ये 89 टक्के गुण मिळवून आपल्या बुध्दीमत्तेची चुणूक दाखवून दिली आहे.

तिच्या या यशाबद्दल मविप्र समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, सर्व संचालक, के टी एच एम महाविद्यालयचे प्राचार्य डॉ व्ही. बी. गायकवाड व सर्व प्राध्यापक यांनी अभिनंदन केले आहे.

रसिकाने मिळवलेले हे यश आम्हाला सगळ्यांना निश्चितच अभिमानास्पद आहे .अतिशय कष्ट करून तिने उज्वल यश संपादन केलेले आहे. क्रिकेटपटू म्हणून कामगिरी करत असतानाच खेळ आणि अभ्यास या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ अतिशय चांगल्या पद्धतीने घातलेला आहे. वर्षभर नियमितपणे सराव, इतर उपक्रमांत सहभाग आणि त्यासोबतच अभ्यास करून तिने चौफेर यश मिळविले.ही निश्चितच आमच्यासाठी अतिशय गौरवास्पद बाबआहे.. तिला पुढे भारतीय क्रिकेट महिला संघात स्थान मिळवायचे आहे. तसेच युपीएससी स्पर्धा परीक्षा मार्फत तिला देशाची सेवा करण्याची इच्छा आहे…

प्रदीप शिंदे, रसिकाचे वडील.

- Advertisment -

ताज्या बातम्या