संगमनेर | Sangamner
केंद्र सरकारच्यावतीने राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 जाहीर झाले. त्यानंतर राष्ट्रीय अभ्यासक्रम आऱाखडा जाहीर झाला. केंद्राने सूचित केल्याने धोरणानुसार राज्याचा अभ्यासक्रम आऱाखडा प्रकाशित झाला. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्राच्या माध्यमातून शालेय स्तराचा अभ्यासक्रम विकसित करण्यात आला. अभ्यासक्रम आराखडा प्रकाशित झाल्यानंतर बालभारतीच्यावतीने यावर्षी इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीचे पुस्तके प्रकाशित करण्यात आली. या सर्वांचा समग्र आढावा घेणाऱी मालिका दैनिक सार्वमतच्यावतीने प्रकाशित करण्यात आली. त्या मालिकेचा राज्यातील शिक्षक, प्रशिक्षक आणि पालकांना देखील मदत झाली.एकूण अभ्यासक्रम, मूल्यमापन आणि पाठ्यपुस्तकात नेमके काय बदल झाले आहेत याचा आढावा घेणार्या या मालिकेचे स्वागत झाले. अनेकांनी विविध समाज माध्यमांतून त्यावर व्यक्त होत प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्यापक स्तरावरील अभ्यासक्रमाचा अत्यंत मर्यादित स्वरूपात नेमकेपणाने आकलन करून देण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.
बदलाची नेमकी दिशा सांगणारी मालिका
दैनिक सार्वमतच्या बदलता अभ्यासक्रम या मालेत राज्याच्या बदललेल्या अभ्यासक्रमाचे सहा भागांत अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांचा नेमका वेध या मालिकेत घेतला आहे. अत्यंत साऱांश रूपाने आणि थोडक्यात महत्त्वाच्या बदलांवर टाकलेल्या प्रकाशझोतामुळे एकूण अभ्यासक्रम समजून घेण्यास निश्चित मदत झाली आहे.अभ्यासक्रमातील बदल प्रशिक्षणातून शिक्षकांपर्यंत पोहचत असताना या मालिकेने शिक्षकांना देखील मोठी मदत झाली आहे. पालकांना देखील ही मालिका अधिक माहिती देणारी ठरली आहे. त्याचबरोबर पाठ्यपुस्तक समजून घेताना दृष्टी काय ठेवायला हवी याची ओळखही यानिमित्ताने होण्यास मदत झाली आहे. या मालिकेचा अधिकाधिक उपयोग शिक्षण विषयक आत्मियता असलेल्या सर्वांनाच झाला आहे.
- – बाळासाहेब दोरगे, गटशिक्षणाधिकारी
ज्ञानवर्धक आणि वेधक मालिका
बदलता अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांच्या संदर्भातील बदलाचा आढावा घेणारी दैनिक सार्वमतची मालिका शिक्षणात कार्यरत असलेल्या सर्वांनाच उपयोगी पडणारी ठरली आहे. नवे बदल शिक्षकांपर्यंत पोहचण्यास मदत झाली आहे. अभ्यासक्रम व्यापक व विस्तारीत स्वरूपात मांडण्यात आलेला असला तरी या मालेच्या माध्यमातून त्याचा सार सांगण्याचा प्रयत्न निश्चित कौतुकास्पद आहे. शिक्षकांना व पर्यवेक्षकीय यंत्रणेला याचा निश्चित उपयोग झाला आहे. नेमकेपणाने बदलाचा घेतलेल्या आढाव्यामुळे ही मालिका निश्चित ज्ञानवर्धक आणि वेधक ठरली आहे. यामुळे अत्यंत कमी भागात व्याप्त असलेला अभ्यासक्रम समजून घेण्यास मदत झाली आहे. त्यामुळे अभ्यासक्रम समजून घेण्यात सुलभता आली आहे.
- – सुनील घुले, केंद्रप्रमुख
अभ्यासक्रम समजून देणारी मालिका
शिक्षणाच्या बाहेर असलेल्या आमच्या सारख्या पालकांना बदलत्या अभ्यासक्रमात नेमके काय आहे? हे फारसे कळण्याचे साधन नाही. मुले शाळेत शिकतात. त्यांची पाठ्यपुस्तकं त्याच्या हाती येतात. आम्ही फार तर पाठ्यपुस्तक आणि त्यातील आशयासंदर्भात मुलांना शिकण्यास मदत करतो. मात्र ही बदलती पाठ्यपुस्तके समजून घेणे आणि अभ्यासक्रमासंदर्भात आवश्यक दृष्टी नसते. त्यामुळे पाठ्यपुस्तक आणि तेही तेवढ्या आशयापुरताच दृष्टीकोन निर्माण होतो. त्यामुळे मुलांनी पाठ्यपुस्तकं नेमकी कशी समजून घेण्याची गरज आहे हे समजून घेण्यास मदत झाली आहे. त्यादृष्टीने बदलता अभ्यासक्रमाच्या मालिकेत आमच्या दृष्टीकोनात बदल घडून आणला आहे.
- – प्रशांत शिरसाठ, पालक
अभ्यासक्रमाची दृष्टी देणारी मालिका
राज्याचा अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तके बदलल्यानंतर अत्यंत कमी शब्दांमध्ये समग्र मालिकेतून समजून देण्याचा प्रयत्न सार्वमतच्या बदलता अभ्यासक्रम या मालिकेने केले आहे. शिक्षक वर्गात अध्यापन करत असताना अध्ययन अनुभव, मूल्यमापन, अध्ययन निष्पत्तीसारख्या महत्त्वाच्या घटकांवर किती लक्ष देण्याची गरज आहे हे अधोरेखित करताना अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तके, अध्ययन, अध्यापन, मूल्यमापन यांच्यातील नाते नव्या अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकाच्या अनुषंगाने उलगडून दाखवणारी ही मालिका शिक्षकांसाठी उदबोधक ठरली. इतक्या मोठ्या अभ्यासक्रमाची ओळख अत्यंत कमी शब्दांत समजून देण्याचा प्रयत्न झाला आहे. यामुळे पालक, शिक्षक सर्वांसाठी ही मालिका उपयोगी ठरली आहे.
- अभ्यासक्रम समाजापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने प्रकाशित केलेला अभ्यासक्रम आणि त्यातील महत्त्वाच्या संकल्पना, महत्त्वाच्या घटकांवर भर देणारी वृत्तमालिका दैनिक सार्वमतने प्रकाशित केली. शिक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयावर शिक्षक, पालक, पर्यवेक्षकीय यंत्रणा या सर्वांसाठी ही मालिका अधिक उपयोगी ठरली आहे.अभ्यासक्रमातील आणि पाठ्यपुस्तकातील महत्त्वाच्या असलेल्या संकल्पनांवर भर देत दैनिक सार्वमतची ही मालिका शिक्षक व पालकांना दृष्टीकोन निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली आहे. अभ्यासक्रमातील अध्ययन ध्येय, क्षमता, अध्ययन निष्पत्ती व पाठ्यपुस्तकांचा आशय, मूल्यमापन यांचे नाते उलगडण्यास या मालिकेने निश्चित मदत केली आहे. त्यामुळे राष्ट्रीय शिक्षण धोरणाप्रमाणे राज्याचा बदललेला अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके शिक्षक व समाजापर्यंत पोहचण्यास मदत झाली आहे. - – डॉ.राजेश बनकर, प्राचार्य-जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, संगमनेर
समग्रतेचे दर्शन घडवणारी मालिका
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार केंद्र व राज्य सरकारने 2026 मध्ये अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला. त्या अनुषंगाने बदलता अभ्यासक्रम ही मालिका दैनिक सार्वमतने प्रकाशित केली. नवीन अभ्यासक्रमानुसार शिक्षकांमध्ये नवनवीन कौशल्य विकसित होण्यासाठी सखोल ओळख करुन देण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे. नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमानुसार बालवाटिका ते कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके विकसित करताना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून अधिक ज्ञान मिळेल अशी रचना केली आहे. या अभ्यासक्रमाची उद्दिष्टे व त्यासाठी करावी लागणारी अंमलबजावणीसाठी शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित केले जात आहेत. शिक्षणाचा मूळ उद्देश विद्यार्थ्यांचा समग्र विकास आहे हे बिंबवण्याचा प्रयत्न या मालिकेतून करण्यात आला आहे. यातून या विषयाचा त्यांचा सखोल अभ्यास, चिंतन व मनन केल्याचे दिसते. ही मालिका शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक घटकांसाठी मार्गदर्शक आहे हे मान्य करावे लागेल. नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रम यासाठी शिक्षकांना सजग करणे व त्यांची मानसिकता निर्माण करण्यासाठी त्यांनी आपले विचार मांडले आहेत. शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी ही लेख मालिका आहे.
- – शांताराम डोंगरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक
बदलता अभ्यासक्रम या दैनिक सार्वमतच्या वृत्त मालिकेने बदलता अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांची ओळख होण्यास मदत झाली. पाठ्यपुस्तकांमधील झालेला बदल शिक्षकांसाठी केवळ पाठ, कवितांपुरता मर्यादित नसतो तर त्यामागे विस्तारलेला दृष्टीकोन असतो. पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय, कृती, सहशालेय उपक्रम आणि अध्ययन निष्पत्ती यांच्यासंदर्भातील दृष्टीकोन या मालेतील लेखातून समजून घेण्यास शिक्षकांना मदत झाली आहे. त्याचबरोबर अभ्यासक्रमाची रचना, त्यामागील दृष्टीकोन, बदललेले वेळापत्रकांसंदर्भातील माहिती मिळणे, त्यामागील भूमिकाही जाणून घेण्यास मदत झाली. मालिका शिक्षक म्हणून खूप उपयोगी वाटली.
- – सुषमा इंगळे
(समाप्त)




