जळगाव – jalgaon
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत (National Food Security Campaign) सन 2021-22 मध्ये अन्नधान्य पिके व गळीत धान्यातंर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारीत कृषि औजारे व सिंचन सुविधा साधने या बाबींसाठी इच्छुक शेतकऱ्यांचे (MahaDBT system) महाडीबीटी प्रणालीव्दारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
पीक प्रात्यक्षिके शेतकरी गटामार्फत राबविली जाणार असल्याने पीक प्रात्यक्षिकांसाठी अर्ज करताना संबंधित कृषि सहाय्यकाशी संपर्क करुन 10 हेक्टर क्षेत्र असणाऱ्या गटांनी नोंदणी करावी. शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी 10 सप्टेंबर, 2021 पर्यंत मुदत देण्यात येत असून विहित मुदतीत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचाच विचार केला जाईल. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी (District Superintendent Agriculture Officer) संभाजी ठाकूर यांनी कळविले आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत हरभरा बियाणासाठी 10 वर्षाआतील वाणास 25 रुपये प्रती किलो, 10 वर्षावरील वाणास 12 रुपये प्रती किलो, संकरीत मका 95 रुपये प्रती किलो व रब्बी ज्वारी बियाण्यासाठी 10 वर्षाआतील वाणास 30 रुपये प्रती किलो, 10 वर्षावरील वाणास 15 रुपये प्रती किलो याप्रमाणे एकूण किंमतीच्या 50 टक्के मर्यादेत अनुदान देय आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला 2 हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे.
पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला 1 एकर मर्यादेत निविष्ठा स्वरुपात अनुदान उपलब्ध करुन दिले जाणार आहे. बियाणे, जैविक खते, सुक्ष्म मूलद्रव्ये, भू सुधारके व पीक संरक्षण औषधे या निविष्ठांसाठी शेतकऱ्याला एक एकरच्या मर्यादेत एका पिकासाठी संबंधीत पिकाच्या प्रकारानुसार 2 ते 4 हजार रुपये प्रती एकर मर्यादेत डीबीटी तत्वावर अनुदान अदा करण्यात येणार आहे. यासाठी कृषि विद्यापीठांचे शास्त्रज्ञांचे सल्ल्याने जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येत असून संपूर्ण पॅकेजचा वापर करणे अनिवार्य आहे. शेतकऱ्यांची निवड ऑनलाईन लॉटरी पध्दतीने होणार असल्याचेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री.ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.