नवी दिल्ली | New Delhi
पाकिस्तानातील (Pakistan) क्वेटा शहरात रेल्वे ट्रॅकजवळ झालेल्या भीषण स्फोटाने (Massive Explosion) मोठी खळबळ उडाली आहे. या स्फोटात तब्बल २३ जणांचा जागीच मृत्यू (Death) झाला असून ४७ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. स्फोट इतका तीव्र होता की परिसरात एकच धावपळ उडाली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, क्वेटा कँट परिसराकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर (Railway Line) ही घटना घडली. स्फोटानंतर एक मालगाडी रुळावरून घसरली. तसेच घटनास्थळाजवळ गोळीबाराचे आवाजही ऐकू आल्याने परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सरकारी रुग्णालयांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.
बलुचिस्तान सरकारचे अधिकारी बाबर युसूफजई यांनी सांगितले की, पोलीस, सुरक्षा दल आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहेत. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरू आहे. अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
बलुचिस्तान (Balochistan) हा पाकिस्तानमधील संवेदनशील आणि अस्थिर भाग मानला जातो. या प्रदेशात अनेक वर्षांपासून हिंसाचार, दहशतवादी हल्ले आणि फुटीरतावादी कारवाया सुरू असून पाकिस्तान सरकारविरोधात (Pakistan Government) विविध संघटना सक्रिय आहेत. दरम्यान या स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.




