नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
संसदेचे पावसाळी अधिवेशन (Monsoon session of Parliament) सुरु असून, या अधिवेशनात काल आणि आज ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरु आहे. यात आज (मंगळवार) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी लोकसभेत जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आल्याची माहिती दिली.
यावेळी शाह म्हणाले की, “पहलगामचा हल्ला अत्यंत भयंकर आणि भीषण होता, त्यावर चर्चा होते आहे, ती झालीही पाहिजे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या आधी मी ‘ऑपरेशन महादेव’ याची माहिती देतो आहे. सुलेमान, अफगाण आणि जिब्रान हे तीन दहशतवादी सेना, सीआरएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मारले गेले असून, यातील सुलेमान हा लष्कर ए तोयबाचा कमांडर होता. पहलगाम हल्ला आणि गगनीर हल्ल्यात त्याचा सहभाग होता”, असे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, “अफगाण लष्कर ए तोयबाचा अतिरेकी होता. जिब्रानही याच प्रकारातील दहशतवादी (Terrorist) होता. मी आज सदनाला हे सांगतो की, ज्यांनी बैसरनच्या खोऱ्यात आपल्या नागरिकांवर हल्ला केला त्यात हे तिन्ही दहशतवादी होते. या तिघांचाही खात्मा करण्यात आला आहे. त्यामुळे लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलीसांना धन्यवाद देतो. पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी धर्म विचारून निरपराध नागरिकांची हत्या केली, याचा मी निषेधे करतो आणि मृतांच्या कुटुंबियांप्रती सहानुभूती व्यक्त करतो”, असेही अमित शाह यांनी म्हटले.
कसं राबवलं ऑपरेशन महादेव?
ऑपरेशन महादेव (Operation Mahadev) याबाबत माहिती देतांना अमित शाह म्हणाले की,२३ एप्रिलला जम्मू काश्मीर पोलीस, लष्कर, सीआरपीएफ यांची संयुक्त बैठक घेतली. त्यात आम्ही पहिला निर्णय केला की देशावर दहशतवादी हल्ला करणाऱ्या एकाही दहशतवाद्याला पाकिस्तानात पळून जाऊ द्यायचे नाही आणि आपण कुणालाही पळून जाऊ दिलं नाही त्यांचा खात्मा केला. २२ मे रोजी गुप्तचर यंत्रणेला एक महत्त्वाची माहिती मिळाली की, एका गावात दहशतवादी उपस्थित आहेत. त्यानंतर २२ मे ते २२ जुलै या कालावधीत दहशतवाद्यांचे सिग्नल तपासण्यात आले.
यानंतर २२ जुलैला आपल्याला सेन्सॉरच्या माध्यमातून हे दहशतवादीच असल्याचे समजले. त्यानंतर चार पॅराचे जवान, लष्कराचे जवान आणि जम्मू काश्मीर पोलीस यांनी संयुक्त कारवाई सुरु केली. यानंतर तीन दहशतवाद्यांना सोमवारी आपण ठार मारले. दहशतवाद्यांची रितसर ओळख पटवण्यात आली. कारण एनआयएने या दहशतवाद्यांना जेवण पोहचवणाऱ्या लोकांना ताब्यात घेतले होते. यात चार जणांची ओळख पटली की ज्या तिघांचा खात्मा केला तेच पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी होते.




