नवी दिल्ली | New Delhi
गेल्या महिनाभराहून अधिक दिवस चाललेल्या इराण आणि अमेरिका-इस्त्रायल (Iran and America-Israel) यांच्यातील युद्धाला विराम मिळाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला दिलेल्या धमकीनंतर दोन आठवड्यांसाठी युद्ध थांबवण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानच्या (Pakistan) प्रस्तावानंतर अमेरिकेने इराणवरील संभाव्य हल्ला थांबवण्याचा निर्णय घेतला.तर होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्याच्या अटीवर १४ दिवसांच्या शस्त्रसंधीला मान्यता देण्यात आल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

इराणची (Iran) अणवस्त्र संपन्न राष्ट्र बनण्याची क्षमता नष्ट करणे आणि रेंजीच चेंज म्हणजे सत्ता बदल ही दोन उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन अमेरिका-इस्रायल या युद्धात उतरले होते. ३८ दिवस (Day) सुरु असलेल्या या युद्धात अमेरिका-इस्रायलने मिळून इराणवर अनेक घाव घातले. युद्धाच्या (War) पहिल्याच दिवशी इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांनी संपवलं. त्यानंतर इराणचे अनेक लष्कर प्रमुख सुरक्षा अधिकारी यांचा खात्मा केला.
इराणला नेतृत्वहीन बनवायचे जेणेकरुन त्यांची जनता रस्त्यावरुन उतरेल. तिथल्या शासनकर्त्यांना सत्तेतून बेदखल करेल असा अमेरिका-इस्रायलचा डाव होता. पण त्यात यश आले नाही. उलट अमेरिका-इस्रायलने हल्ले (Attack) सुरु केल्यानंतर सर्वसामान्य इराणी अजून एकवटले. महिना दीड महिन्यापूर्वी जे लोक रस्त्यावर उतरुन आपल्याच शासनाविरोधात आंदोलन करत होते, ते युद्ध काळात सरकार सोबत असल्याचे दिसले.
शस्त्रसंधीनंतर ट्रम्प काय म्हणाले?
दरम्यान, सोशल मीडियावरील (Social Media) एका पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले की, “मी इराणवरील बॉम्बहल्ले आणि हल्ले दोन आठवड्यांसाठी थांबवण्यास सहमत झालो आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला, ज्यांनी त्यांना नियोजित हल्ले पुढे ढकलण्याची विनंती केली होती”, असे त्यांनी म्हटले. याआधी ट्रम्प यांनी इराणला इशारा देत करार न झाल्यास एक संपूर्ण संस्कृती नष्ट होऊ शकते, असे म्हटले होते. ज्यावर अमेरिकेतूनही टीका झाली होती.
पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ काय म्हणाले?
शस्त्रसंधीनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांनी ट्विट करत म्हटले की, “अत्यंत विनम्रतेने मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण’ आणि ‘युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका’ तसेच त्यांचे सहयोगी देश यांनी लेबनॉनसह इतर सर्वत्र तातडीने युद्धविराम करण्याबाबत सहमती दर्शविली आहे. आणि हा युद्धविराम त्वरित अंमलात येईल. मी या सुज्ञ निर्णयाचे मनापासून स्वागत करतो आणि दोन्ही राष्ट्रांच्या नेतृत्वाप्रती माझी कृतज्ञता व्यक्त करतो. तसेच, सर्व वाद मिटवून एका निश्चित करारापर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने पुढील चर्चा करण्यासाठी, मी त्यांच्या शिष्टमंडळांना शुक्रवार १० एप्रिल २०२६ रोजी इस्लामाबादला भेट देण्याचे निमंत्रण देतो”, असे ते म्हणाले.




