नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे दि. २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) २६ जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर भारताने (India) पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करत आधी सिंधू नदीचे पाणी थांबवण्याची घोषणा केली. यानंतर शनिवारी भारताने पाकिस्तानसोबतचा सर्व प्रकारचा आयात-निर्यात व्यापार बंद करण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे पाकिस्तानचे नेते भारताविरोधात गरळ ओकताना दिसत असून, पोकळ धमकी देत आहेत. अशातच आता रशियातील पाकिस्तानचे (Pakistan) राजदूत मोहम्मद खालिद जमाली (Muhammad Khalid Jamali) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोठे विधान केले आहे. “जर भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कोणतीही कारवाई केली, तर पाकिस्तान त्यांच्यावर अणुबॉम्ब हल्ला करेल”, असे विधान जमाली यांनी केले आहे. त्यांचे हे विधान म्हणजे एक पोकळ धमकी समजली जात आहे.
दरम्यान, यापूर्वी पाकिस्तानच्या बिलावल भुट्टो यांनी भारताच्या सिंधू जल करार (Indus Water Treaty) स्थगित करण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, “सिंधू नदी आमची होती, आमची आहे आणि आमचीच राहील. त्यात एकतर आमचे पाणी वाहील किंवा त्यांचे रक्त”, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. तसेच संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी “जर भारताने सिंधू जल कराराचे उल्लंघन करून सिंधू नदीचे पाणी रोखले तर पाकिस्तान भारतावर हल्ला करेल”, असे म्हटले आहे. पाकिस्तानी नेत्यांच्या या विधानांमुळे पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तान घाबरल्याचे दिसत आहे.
चौकशीपूर्वी आरोप करू नका – पाकिस्तान
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याची मुळे पाकिस्तानमध्ये असल्याचा दावा भारत सरकारकडून केला जात आहे. सुरुवातीच्या तपासात याचे पुरावेही सापडले आहेत. मात्र, पाकिस्तानने भारताची भूमिका नाकारत कोणत्याही पुराव्याशिवाय भारत खोटे आरोप करत असल्याचे म्हटले आहे. तर हा हल्ला सीमापार दहशतवादाचा एक भाग असून, जो दशकांपासून काश्मीरला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे, असे भारताने म्हटले आहे.