नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाममध्ये (Pahalgam) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार आणि भारतीय लष्कर अॅक्शन मोडमध्ये आले आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताकडून जोरदार हालचाली सुरू असून, भारत कधीही हल्ला करेल यामुळे पाकिस्तान देखील घाबरला आहे. दुसरीकडे पहलगाम हल्ल्यानंतर भारताने (India) पाकिस्तानवर (Pakistan) अनेक निर्बंध लादले असून,पाकिस्तानी नागरिकांना भारतामधून परत पाठवण्यात आले. यानंतर आता देशामध्ये असलेल्या पाकिस्तानी हेरांविरोधात पंजाब पोलिसांनी मोठी कामगिरी करत अमृतसरमध्ये मोठे गुप्तहेर प्रकरण उघडकीस आणले आहे
पंजाब पोलिसांनी (Punjab Police) पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेशी संबंधित एका हेरगिरी नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. भारतीय सैन्याची गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवल्याच्या गंभीर आरोपाखाली पोलिसांनी अमृतसर (Amritsar) येथून पलक शेर मसीह आणि सूरज मसीह या दोन संशयितांना अटक केली आहे. तपासात असे दिसून आले आहे की दोन्ही आरोपींनी भारतीय लष्करी छावण्या, हवाई तळ आणि इतर मोक्याच्या ठिकाणांचे फोटो आणि माहिती शत्रू देशाला दिली. तुरुंगात बंद असलेल्या गुंड हरप्रीत सिंग उर्फ पिट्टू उर्फ हॅपीच्या नेटवर्कद्वारे ही सर्व माहिती आयएसआयला (ISI) पाठवली जात असल्याचे समोर आले असून, तपासामध्ये आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, एक दिवस आधीच राजस्थानमधून (Rajasthan) एका गुप्तहेराला अटक (Arrested) करण्यात आली होती.पोलिस गुप्तचर शाखेने पकडलेल्या पाकिस्तानी गुप्तहेराची ओळख ४० वर्षीय पठाण खान अशी झाली आहे. तो जैसलमेरमधील झिरो आरडी मोहनगडचा रहिवासी असून,तो बराच काळ पाकिस्तानी गुप्तहेरांना लष्करी क्षेत्राचे व्हिडिओ आणि फोटो पाठवत असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय एका पाकिस्तानी रेंजरलाही भारतीय लष्कराने ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे.