Monday, April 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजBalendra Shah : रॅपर होणार नेपाळचे पंतप्रधान! भारताला दिला होता इशारा, कोण...

Balendra Shah : रॅपर होणार नेपाळचे पंतप्रधान! भारताला दिला होता इशारा, कोण आहेत बालेन शाह?

नवी दिल्ली | New Delhi

नेपाळ सरकारने (Nepal Government) एक्स, फेसबुक, इन्स्टाग्रामसह २६ सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातल्यामुळे GenZ तरूणाचा (Youth) उद्रेक झाला. या निर्णयाच्या निषेधार्थ नेपाळची राजधानी काठमांडूसह अनेक ठिकाणी या तरुणांनी हिंसक निदर्शने केली. यानंतर सरकारने अखेर सोमवारी (दि. ८) आपला निर्णय मागे घेतला. मात्र तरी सुद्धा तरुणांचे आंदोलन सुरु असून, त्यांनी आज संसदेला घेराव घालत आग लावली. त्याचप्रमाणे मंत्र्यांच्या घरांवर हल्ला केला. यानंतर नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली (KP Sharma Oli) यांनी आपल्या पदाचा राजीनामा (Resigns) दिला.

- Advertisement -

त्यानंतर आता नेपाळमध्ये सत्तांतराची प्रक्रिया सुरू झाली असून, आंदोलकांनी पंतप्रधान पदासाठी काठमांडूचे ३५ वर्षीय महापौर (Kathmandu Mayor) बालेन शाह (Balendra Shah) यांचे नाव सुचवले आहे. त्यांनी पंतप्रधानपद स्वीकारावे आणि देशाची सूत्रे हाती घ्यावीत, अशी आंदोलक तरुणांची मागणी आहे. त्यामुळे नेपाळचे नेतृत्व त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, रामायणाच्या कथेवर आधारित असलेला आदिपुरुष सिनेमा २०२३ मध्ये प्रदर्शित झाला. त्यावेळी बालेन शाह यांनी या चित्रपटातील काही संवादांना आक्षेप घेतला. हे संवाद चित्रपटातून हटवण्याची मागणी केली होती. संवाद न हटवल्यास नेपाळ आणि काठमांडूमध्ये कोणताही भारतीय सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी धमकी शाह यांनी दिली होती.

बालेन शाह नेमके कोण आहेत?

बालेन शाह हे पेशाने इंजिनीअर असून, त्यांनी सुरुवातीला अभियांत्रिकी क्षेत्रात काम केले आहे. त्यानंतर ते रॅपर झाले. यामुळे ते तरुणाईत लोकप्रिय झाले. बालेन शाह यांची एकूण संपत्ती नेपाळी रुपयांमध्ये ५ ते ६ कोटी असून, मासिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यांचा जन्म २७ एप्रिल १९९० रोजी काठमांडू येथे झाला. वडील आयुर्वेदिक चिकित्सक तर आई गृहिणी आहेत. कर्नाटकातील विश्वेशरैय्या टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटमधून (Visvesvaraya Technological University VTU) बालेन शाह यांनी स्ट्रक्चरर इंजिनिअरिंग या विषयात M.Tech ची पदवी घेतली आहे.

बालेन शाह यांचा राजकीय प्रवास

शाह यांनी २०२१ मध्ये काठमांडूच्या महापौर पदासाठी स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्यानंतर २६ मे २०२२ रोजी काठमांडू महानगरपालिकेच्या महापौरपदी ते विराजमान झाले. सध्या महापौर असल्याने त्यांना महिन्याकाठी ४६ हजार रुपये वेतन मिळते. मात्र यापेक्षा अधिक कमाई ते अभियांत्रिकीशी संबंधित कामं आणि संगीतामधून (रॅप) कमावतात. अभियांत्रिकीमधून बालेन यांची सर्वाधिक कमाई होते. ते बालेन कन्सल्टिंग अँड कंस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. याशिवाय त्यांनी पद्म ग्रुप ऑफ कंपनीच म्हणजे उपव्यवस्थापक पदावर काम केले आहे.

आतापर्यंत २३ आंदोलकांचा मृत्यू , अनेकजण जखमी

नेपाळमधील तरुण आक्रमक झाल्यानंतर पोलिसांकडून (Police) त्यांच्यावर गोळीबार (Firing) करण्यात आला. यात आतापर्यंत २३ आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. तर ४०० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. सरकारने कालच सोशल मीडियावरील (Social Media) बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यानंतरही येथील तरुणाईचा रोष कमी झालेला नसून, आंदोलनाची धग नेपाळमध्ये कायम दिसत आहे.

ताज्या बातम्या

Nashik NDCC Bank News : कर्जमाफीच्या अपेक्षेने वसुली कोलमडली; शेतकरी जिल्हा...

0
नाशिक | विजय गिते | Nashik राज्य शासनाकडून कर्जमाफीची (Loan Waiver) घोषणा होईल, या केवळ 'अपेक्षेपोटी' जिल्ह्यातील चालू कर्जदारांनी आपली थकबाकी भरण्याकडे पाठ फिरवली आहे....