मुंबई | Mumbai
गेल्या वर्षी भाजपच्या (BJP) तिकिटावर लोकसभा निवडणूक (Loksabha Election) लढवणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी राज्यसभेवर नियुक्ती केली आहे. निकम यांनी मागील वर्षी उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला होता. यानंतर त्यांची वर्षभरातच राज्यसभेवर निवड करून राजकीय पुनर्वसन करण्यात आले आहे.
उज्ज्वल निकम यांच्यासह केरळमधील (Kerala) ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन मस्ते (Sadanandan Maste) माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला (Harshvardhan Shringala) आणि प्रख्यात इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन (Meenakshi Jain) यांची देखील राष्ट्रपतींकडून राज्यसभेसाठी (Rajyasabha) नियुक्ती करण्यात आली आहे. एका सरकारी अधिसूचनेद्वारे आज (रविवारी) सकाळी ही अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
दरम्यान, उज्ज्वल निकम हे प्रसिद्ध सरकारी वकील असून, त्यांनी अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये सरकारचे (Government) प्रतिनिधित्व केले आहे. २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या अजमल कसाब खटल्यासह आणि १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यासह अनेक उच्च-प्रोफाइल प्रकरणांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून निकम यांनी काम केले आहे. त्यांच्या दशकांच्या कायदेशीर कारकिर्दीत, त्यांनी अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये महाराष्ट्र सरकारचे (Maharashtra Government) प्रतिनिधित्व केले आहे.
राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे?
राज्यसभेची एकूण सदस्य संख्या २५० आहे. ज्यात २३८ निवडून आलेले सदस्य असतात तर १२ नामनिर्देशित सदस्यांचा समावेश असतो. आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चार जणांची नियुक्ती ही पूर्वी नामनिर्देशित सदस्यांच्या निवृत्तीमुळे रिक्त झालेल्या जागांवर करण्यात आली आहे. संविधानाच्या कलम ८० (१)(A) च्या कलम (३) द्वारे राष्ट्रपतींना मिळालेल्या अधिकारांनुसार त्यांनी चार जणांची नियुक्ती राज्यसभेवर केली आहे. यात साहित्य, विज्ञान, कला आणि समाजसेवा यासारख्या क्षेत्रात विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्या व्यक्तींचा सहभाग असतो.




