Friday, May 3, 2024
Homeधुळेयोगातून राष्ट्रसेवा

योगातून राष्ट्रसेवा

प्रस्तुत लेखनाचा प्रतिपाद्य विषय ‘योगातून राष्ट्रसेवा’ असा असला तरी त्यासाठी योगाचा इतिहास किंवा संकल्पना संक्षिप्तपणे विशद करणे आवश्यक वाटते. मुळात योग हा शब्द कानी पडताच सर्व सामान्यांच्या डोळ्यासमोर शरीर अवयवांची कसरत करणार्‍या व्यक्तीची काल्पनिक प्रतिमा उभी राहाते; आणि ते खरे ही आहेच, तथापि, केवळ वेगवेगळ्या आसनांचा अभ्यासात्मक आविष्कार म्हणजे योग नव्हे.. ती एक जीवनशैली, एक पद्धती किंवा जीवन जगण्याची कला आहे.एक जीवनाभिमुख असे मार्गदर्शक तंत्रज्ञान आहे.

भारतीय तत्वज्ञानात योगविचार हा एक आध्यात्मिक ठेवा आहे. श्रीमद्भगवद्गीता, वेद व उपनिषदे यात योगविचाराची प्रामुख्याने समिक्षा आढळते. भारतीय वैदिक तत्वज्ञान शास्त्रात योग व वेदांत तसेच इतरत्र जैन व बौद्ध अवैदिक दर्शन शास्त्रातही योगविचार अनुस्युत असल्याचे जाणवते. नाथपंथ आणि काश्मीरशैव संप्रदायांनीही योगाची महती मान्य केली आहे. ज्ञानेश्वर माऊलीना योगविचारांचा वारसा नाथपंथीय तत्वज्ञान, श्रीमद्भगवद्गीता, योगदर्शन व उपनिषदें यांच्याकडून मिळाला आहे. योग हा शब्द संस्कृत वाङ्मयातील ‘युज’ या धातुपासून आला आहे. याचा अर्थ जुळवणी, संगती, जोडणे, मिळवणी असा आहे.

- Advertisement -

वैदिक ज्ञानाच्या अधिकार श्रेणीनुसार अपौरुषेय चार प्रमुख वेद आहेत. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. यानंतर चार उपवेद येतात.आयुर्वेद, अर्थर्वेद, धनुर्वेद व गंधर्ववेद. यांच्या खालोखाल सहा घटकांगें किंवा उपांगे आहेत जसे शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष. यानंतर पुन्हा सहा उपघटकात वर्गवारी होते, ती म्हणजे न्याय, वैसेशीक, सांख्य, मीमासा, वेदान्त व योग. आणि याच योगाविष्कारातून राष्ट्रसेवेच्या संभावनाचा आपणास परामर्ष घ्यावयाचा आहे.

उपरोक्त विवेचनानुसार ‘योग’ हा वैदिक साहित्याचाच एक भाग असून महर्षि पातांजलीनी या विषयाचे लोक कल्याणासाठी अभ्यासपूर्ण संपादन केले आहे. त्यांनी योगाचे आठ भाग स्पष्ट केले आहत जसे यम (सामाजिक आचार संहिता), नियम (व्यक्तिगत नीतिनियम किंवा आचरण), आसन (शारीरिक स्थिती किंवा क्षमता विकास), प्रणायाम (जीवन उर्जा), प्रत्याहार (ज्ञानेदियांचे संघटन), धारणा (लक्ष्यसाधन किंवा एकाग्रतेचा विकास), ध्यान व समाधी (स्वत्वात विलीनीकरण).

याशिवाय योगशास्त्रात काही तात्विक संकल्पना अनुस्युत आहेत. जसे ज्ञानयोग, भक्तीयोग, कर्मयोग, हटयोग, राजयोग, मंत्रयोग, शिवयोग, नादयोग, लययोग आणखी बरेच काही आहे. यापैकी हटयोग परंपरेचा आसने हा एक भाग आहे. साम्प्रतच्या काळात योगाचा संबंध केवळ विविध आसनांशी जोडला जातो. परंतु, योगाची मध्यवर्ती संकल्पना व्यक्तिमत्व विकास ही आहे.शरीर, मन, बुद्धि , विवेक, उपासना व कर्मशुचिता यातील जीवनदत्त उर्जाचा व्यवस्थित समन्वय साधून एक प्रकारची कौशल्य साधनाच म्हणावयाची. म्हणूनच भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद्भगवद्गीतेत ‘योगः कर्मसु कौशलम्’ (अ.2.50) असे म्हटले असावे. थोडक्यात काय तर कर्म आणि अभिव्यक्तीतील कौशल्य म्हणजेच योग.

– पी.आर.जोशी.

मो.92232 83985

- Advertisment -

ताज्या बातम्या