अहमदनगर (प्रतिनिधी) – दिल्लीच्या त्यागराज स्टेडीयम येथे झालेल्या कजाक कुराश नॅशनल चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत नगरच्या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या अंजली वल्लाकट्टी यांनी सुवर्णपदक पटकावले. चंडीगडच्या खेळाडूला अवघ्या पन्नास सेकंदात आसमान दाखवत अंतिम फेरीत बाजी मारली. अंजली वल्लाकट्टी यांची आता कजाकिस्तान येथे होणार्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय संघात निवड झाली आहे.
कुस्तीपटू अंजली वल्लाकट्टी यांनी या आधीही अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सुवर्णपदके पटकावली आहेत. मात्र गेल्या 10 ते 12 वर्षांपासून त्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांपासून अलिप्त होत्या. मात्र यावर्षी राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेऊन प्रदीर्घ काळानंतर त्यांनी यावर्षीच्या कजाक कुराश नॅशनल चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत भाग घेतला.
त्यासाठी भरपूर सराव करत मेहनत घेतली होती. क्रीडा प्रशिक्षक प्रा.संजय धोपावकर व अंकुश नागर यांनी त्यांना मार्गदर्शन केले. या स्पर्धेत झालेले सर्वसामन्यांचा निकाल गुणांवर आधारावर देण्यात आले. मात्र केवळ अंजली वल्लाकट्टी यांनीच प्रतिस्पर्धीला चीतपट करण्याची कामगिरी केली. हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य. अंजली वल्लाकट्टी यांनी केलेल्या या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.