निसर्गकवी पद्मश्री ना. धों. महानोर (दादा) यांचे नांदगावशी एक वेगळेच नाते आहे. महानोरांच्या जडणघडणीत नांदगावचा खारीचा वाटा आहे. दादांचे सासरे मदनेबाबा नांदगावी रेल्वेत नोकरीला होते. येथील आनंदनगरमध्ये सासरेबुवांचे घर होते. नांदगाव शहर तसे खेडेवजा गाव! खरेतर नांदगावला रेल्वेमुळेच महत्व प्राप्त झाले होते. नांदगावचा उल्लेखच ‘स्टेशनचे नांदगाव’ असा केला जातो.
नांदगावमध्ये रेल्वेची लायब्ररी फार मोठी होती. लायब्ररीची इमारत अतिशय भव्य अशी आहे. भुसावळ-इगतपुरीदरम्यान नांदगावचे लोकोशेड फार मोठे होते. रेल्वे कर्मचार्यांची संख्या खूप मोठी होती. त्यामुळे शहराला एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. रेल्वे लायब्ररीत ग्रंथसंपदा विपुल होती. सर्व नियतकालिके, मासिके तेथे नियमित येत. महानोर दादांसाठी रेल्वेची लायब्ररी मोठी पर्वणीच होती.
ज्या वेळी दादा सासुरवाडीस येत तेव्हा त्यांचा बराच वेळ रेल्वेच्या लायब्ररीत जात असे. दादा तेथे तासन्तास वाचन करीत. दादांमधील साहित्याला जसा अजिंठा परिसराने परिसस्पर्श केला; तसाच किंचितसा स्पर्श नांदगावच्या रेल्वे लायब्ररीचाही आहे. नांदगावच्या अनेक समारंभात दादांनी त्याचा उल्लेख केला होता. पळसखेड्यावर तसेच तेथील शेतीमातीवर दादांचे निसर्गदत्त प्रेम होते. तसेच नांदगावचा रेल्वेचा निसर्गरम्य परिसरही त्यांच्या मनाला भुरळ घालायचा.
आज रेल्वेचा परिसर तसा राहिला नाही. कोळसा इंजिन जावून इलेक्ट्रिक इंजिन आले. नांदगावच्या रेल्वेला उतरती कळाच लागली. रेल्वेचे कर्मचारी कमी झाले. तशी लायब्ररीला अवकळा आली आहे. आता आम्ही आठवणींवरच समाधान मानत आहोत. काही वर्षांपूर्वी दादांच्या सासर्यांचे नांदगावी निधन झाले. तेव्हा दादा दोन-तीन दिवस नांदगावी होते.
नांदगावातील साहित्य क्षेत्रात रुची असलेल्या आम्ही काही मंडळीने अगोदरच काव्यमैफिलीचे आयोजन केले होते. कार्यक्रम अत्यंत छोटेखानी होता. काहींच्या डोक्यात कल्पना आली. महानोर दादा नांदगावीच आहेत. ते आले तर खूप चांगले होईल. दिवंगत पत्रकार मित्र बापू आहेर, रमेश सोर, प्रकाश गोटे या दादांच्या कौटुंबिक मित्रांची याकामी मदत घेतली. दादांना माझ्या प्रेसवर चहापाण्यासाठी बोलावले.
दादाही आले. त्यांना मित्रांची विनंती सांगितली. दादा सुरूवातीला म्हणाले, मी वेगळ्या विधीसाठी नांदगावी आलो आहे. अशा प्रसंगी कार्यक्रमास येणे उचित होणार नाही. तुम्ही पुन्हा केव्हा तरी बोलवा. मी निश्चित येईल. आम्ही थोडी गळ घातली. दादांना आमचा उत्साह पाहून आमचे मन मोडवले नाही. दुसर्या दिवशी ते कार्यक्रमास आले. दु:ख विसरून दादांनी कविता सादर केल्या. छोट्या सभागृहातही दादांची लय लागली होती. त्यांच्या कवितांनी सारे सभागृह न्हावून निघाले. त्या दिवसापासून आजतागायत दादांशी कौटुंबिक स्नेह कायम राहिला.
दादा नांदगावी आले की, आमच्यासाठी ती पर्वणीच असायची. शब्द व माणसांवर प्रेम करणारे निसर्गकवी; ज्यांनी आपल्या शब्दसामर्थ्याने अवघे मराठी साहित्यविश्व व्यापले ते आपले सर्वांचेच आहेत याचा सार्थ अभिमान आहे. नांदगाव ही नाधों दादांची रूढार्थाने सासुरवाडी होती. नांदगावकरांशी त्यांची नाळ कायम जुळलेली राहिली. आज त्यांच्या निधनाने ही नाळ जरी तुटली तरी स्मृती कायम राहतील.
– भास्कर कदम