नाऊर |वार्ताहर| Naur
श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील जिल्हा बँकेच्या शाखेमधील कर्मचार्याने दोन ते तीन खातेदारांच्या खात्यातून परस्पर 18 ते 20 लाख रुपये काढले असल्याची माहिती प्राप्त झाली असून त्या संदर्भात बँकेचे तालुका अधिकारी शिवाजी पवार यांच्यासह ऑडिटर हे बँकेच्या खात्यातील काढलेल्या रकमेची माहिती घेत आहे.
बँकेचे खातेदार किशोर शरद शिंदे यांनी दोन दिवसापूर्वी आपल्या स्वःतच्या खात्यातून 1 लाख रुपये काढले. त्यानंतर खात्यामध्ये किती शिल्लक आहे हे तपासण्यासाठी सोबत आणलेले पासबुक दिले असता त्यांच्या खात्यात 2 लाख शिल्लक असल्याचे दिसल्यामुळे त्यांनी माझ्या खात्यात 10 लाख रुपये होते. शिल्लक 9 लाख पाहिजे तर दोनच लाख कसे? असा सवाल करत माझे 7 लाख कुठे गेले असा प्रश्न शाखाधिकार्यांना केला. त्यानंतर शिंदे यांनी त्यांच्या बंधूला या गोष्टीची माहिती देत बँकेत बोलावून घेतले.
तेव्हा त्यांचे बंधू यांच्या देखील खात्यातून 2 ते 3 लाख कमी असल्याचे जाणवले. म्हणून सुट्टीवर असलेला कर्मचारी यांना संपर्क केला असता फोन बंद आल्याने अधिकच संशय बळावला. ही वार्ता दोन दिवसांनी म्हणजे काल गुरुवार दि. 17 रोजी गावातील खातेदारांना समजल्याने अनेक खातेदारांनी बँकेसमोर खात्यातील पैसे चेक करण्यासाठी गर्दी केली होती. बँकेचे तालुका अधिकारी शिवाजीराव पवार यांनी ऑडिटर सह स्वतः नाऊर शाखेत येऊन खातेदारांना व्यवस्थित माहिती दिली.
दरम्यान, सन 2021 पासून बँकेतील ठराविक काही खातेदारांच्या रकमा परस्पर काढल्या गेल्या असल्याचे समजते. रात्री उशिरापर्यंत एकंदरीत किती रक्कम परस्पर काढली हे समजू शकले नाही. याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सदस्य विजय शिंदे तसेच माजी उपसरपंच दिगंबर शिंदे यांनी देखील पॅनिक न होता, आपली बँक गावासह परिसरासाठी आदर्श आहे.कुणीही गडबड करू नये,आपल्या खात्यातील पैसे सुरक्षित असून ते सर्वांना मिळती अशी ग्वाही दिली.
आपले सर्वांचे खाते सुरक्षित असून ठराविक काही खातेदार यांच्या खात्यातून काही रक्कम काढली गेली किंवा नाही याची चौकशी सुरु असून कोणी गैरसमज करू नये, सर्वांचे पैसे सुरक्षित आहे. ज्यांना शंका आहेत त्यांनी पासबुक भरून घ्यावेत, बँकेकडे हजारो करोड रुपयांच्या ठेवी आहेत. सर्वांनी एका वेळेस गर्दी करू नये.
– शिवाजीराव पवार, तालुका विकास अधिकारी, जिल्हा बँक श्रीरामपूर




